यमुनेच्या लाटांवर आता क्रूझ सफारी!

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
cruise-safari-on-the-waves-of-the-yamuna राजधानी दिल्लीतील पर्यटनाला नवी दिशा देणारा ‘नमो यमुना रिव्हर सफारी’ हा उपक्रम आजपासून सुरू होत आहे. यमुना नदीतून क्रूझ प्रवासाचा आनंद घेण्याची संधी आता दिल्लीकरांसह पर्यटकांना मिळणार आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सरबानंद सोनोवाल यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन होणार असून, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचीही यावेळी उपस्थिती असेल.
 
cruise-safari-on-the-waves-of-the-yamuna
 
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकल्पाची माहिती दिली. यमुना नदीशी नागरिकांचे नाते अधिक दृढ करण्यासोबतच मनोरंजन आणि पर्यटनासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नदीकिनाऱ्याला पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
 
राष्ट्रीय जलमार्ग कायदा २०१६ अंतर्गत यमुना नदीला राष्ट्रीय जलमार्ग ११० म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया विहार ते जगतपूर या नदीपात्रातील भागात क्रूझ सेवा सुरू करण्यात येत आहे. जलमार्गाचा पर्यटन आणि मनोरंजनासाठी उपयोग करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
 
या सफारीचा प्रवास सोनिया विहार ते जगतपूर असा सुमारे पाच किलोमीटरचा असेल. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी अंदाजे ४० मिनिटे लागतील. सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत ही सेवा उपलब्ध असेल. एका क्रूझमधून एकावेळी जास्तीत जास्त ३० प्रवाशांना प्रवास करता येणार असून, प्रत्येक व्यक्तीसाठी तिकिटाचे शुल्क ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. दिल्ली पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावरून प्रवाशांना ऑनलाइन तिकीट आरक्षित करता येणार आहे.
 
दिल्लीतील यमुना नदीच्या प्रवाहाचे स्वरूप पाहता या प्रकल्पासाठी निवडलेला भाग महत्त्वाचा आहे. पल्ला ते वझीराबाद हा सुमारे २६ किलोमीटरचा पट्टा तुलनेने स्वच्छ आणि पाण्याने भरलेला असतो. त्यापुढील वझीराबाद बॅरेज ते ओखला बॅरेज हा अंदाजे २२ किलोमीटरचा भाग मात्र प्रदूषणाच्या समस्येला सामोरा जात आहे. या परिसरात २२ मोठे नाले नदीला मिळतात. त्यामध्ये नजफगड नाला हा सर्वांत मोठा नाला आहे. या नाल्यांमुळे यमुनेच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे सांगितले जाते.
 
सफारी सुरू करण्यापूर्वी मागील महिन्यात क्रूझची प्रायोगिक फेरी घेण्यात आली होती. भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण आणि दिल्ली सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली आहे.
 
या सेवेसाठी इलेक्ट्रिक क्रूझचा वापर करण्यात येणार असल्याने पर्यावरणपूरक जलवाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच शहरी पर्यटन आणि जलमार्गांचा विकास यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे. दिल्लीकरांना यमुना नदीचा वेगळा अनुभव घेता यावा आणि नदीशी त्यांचा संपर्क वाढावा, या उद्देशाने सुरू होणारी ही सफारी राजधानीतील पर्यटनाचे नवे आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.