नागपुरातील शाळेत ‘वेदांती’ची एन्ट्री

रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेचे उद्घाटन

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
विद्यार्थ्यांशी संवाद साधणार एआय रोबोट शिक्षिका!
नागपूर,
obotics and Artificial Intelligence Laboratory शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना नागपुरातील पूजनीय गोळवलकर गुरुजी महाविद्यालयाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक्सची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी संस्थेत अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून, या उपक्रमाचे खास आकर्षण ठरली आहे ‘वेदांती’ नावाची एआय आधारित रोबोट शिक्षिका. महाराष्ट्रातील पहिली एआय आधारित रोबोट शिक्षिका म्हणून तिची ओळख करून देण्यात आली आहे.या रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेचे उद्घाटन माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे रमेश बक्षी, सुनील खानखोजे, शुभांगी फुटाणे, ललित तपासे, मोहन साठे, गुणवंत अभ्यंकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वंदना बडवाईक यांची उपस्थिती होती.
 
 
obotics and Artificial Intelligence Laboratory
 
उद्घाटनानंतर मान्यवरांनी प्रयोगशाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या विविध वैज्ञानिक प्रयोगांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, संशोधनाची आवड निर्माण करणे आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.या कार्यक्रमात ‘वेदांती’ रोबोट शिक्षिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना तिने उत्तरे दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या या रोबोटशी विद्यार्थ्यांनीही उत्साहाने संवाद साधला. त्यामुळे विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञान केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
 
 
शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, एआय आणि प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोगांच्या माध्यमातून कौशल्याधारित शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे प्राचार्य डॉ. वंदना बडवाईक यांनी सांगितले. शालेय वयातच विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख झाल्यास भविष्यातील संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सक्षम पिढी घडण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या प्रयोगशाळेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल प्राचार्य डॉ. वंदना बडवाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पारंपरिक शिक्षणासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सचा समावेश करण्याचा हा उपक्रम नागपुरातील शैक्षणिक क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे.