हैदराबाद
pawan kalyan दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. राजकारण आणि अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पवन कल्याण यांच्या तिसऱ्या विवाहाचाही शेवट झाला आहे. रशियन मॉडेल अॅना लेझनेवा यांच्यासोबत तब्बल १३ वर्षे संसार केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, पवन कल्याण यांचा हा तिसरा विवाह होता आणि त्यांचे यापूर्वीचे दोन्ही विवाहही घटस्फोटात संपले होते.

पवन कल्याण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. सलग दोन निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर त्यांनी अखेर आंध्र प्रदेशातील पिठापुरम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, त्यांच्या राजकीय यशाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील घडामोडीही सातत्याने चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
पवन कल्याण आणि अॅना यांनी विभक्त होण्याचा निर्णय परस्पर संमतीने आणि एकमेकांचा आदर राखून घेतल्याचे स्पष्ट केले आहे. दोघांनी जारी केलेल्या निवेदनात, वैवाहिक नाते संपुष्टात आले असले तरी एकमेकांशी मैत्रीचे संबंध कायम राहतील, असे म्हटले आहे. तसेच आपल्या मुलांचे समर्पित पालक म्हणून दोघेही जबाबदारी पार पाडत राहतील. मुलांचे सुख आणि कल्याण हेच आपले समान प्राधान्य असेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
पवन कल्याण यांच्या पहिल्या विवाहाची सुरुवात १९९७ मध्ये झाली. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अवघ्या एका वर्षात त्यांनी नंदिनी यांच्याशी विवाह केला. मात्र, या नात्यात सुरुवातीपासूनच मतभेद असल्याचे सांगितले जाते. विवाहानंतर पवन यांनी नंदिनी घर सोडून गेल्याचा आरोप केला होता. २००१ पासून दोघेही स्वतंत्र राहत होते. दरम्यान, २००७ मध्ये नंदिनी यांनी पवन कल्याण यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला. विवाहित असतानाच त्यांनी अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी लग्न केल्याचा आरोप नंदिनी यांनी केला होता. यावर बचाव करताना पवन यांनी रेणू यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची कबुली दिली होती. अखेर २००८ मध्ये पवन आणि नंदिनी यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर पवन यांना पहिल्या पत्नीला नुकसानभरपाई म्हणून पाच कोटी रुपये द्यावे लागले होते.
पहिला विवाह संपल्यानंतर पवन कल्याण यांनी २००९ मध्ये अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी विवाह केला. मात्र, त्यांचे वैवाहिक आयुष्यही फार काळ टिकू शकले नाही. लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांत म्हणजे २०१२ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा घटस्फोट झाला. ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, या दाम्पत्याला अकिरा नंदन नावाचा मुलगा आणि आद्या नंदन नावाची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
रेणू देसाई यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर पवन कल्याण यांनी २०१३ मध्ये रशियन मॉडेल अॅना लेझनेवा यांच्याशी तिसरा विवाह केला. या नात्याला आता १३ वर्षे पूर्ण झाली होती. मात्र, अखेर या दोघांनीही वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. परस्पर संमतीने घेतलेल्या या निर्णयानंतर पवन कल्याण यांच्या तीन विवाहांची आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.