मुंबई
pratap sarnaik ऐन दिवाळीत महाराष्ट्राच्या राजकारणात भेटीगाठींचे फटाके फुटू लागले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकमेकांपासून दूर गेलेले नेते पुन्हा एकमेकांच्या भेटीला जात असल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांची ही अचानक झालेली भेट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे गट एकमेकांपासून दूर झाले. दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून सातत्याने एकमेकांवर टीका केली जात आहे. निवडणुकीच्या मैदानातही दोन्ही गट आमनेसामने आले होते. दसरा मेळाव्यांमधूनही उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार निशाणा साधला होता. असे राजकीय वातावरण असतानाही दिवाळीनिमित्त दोन्ही गटांतील नेत्यांची भेट झाल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भेटीबाबत संजय राऊत यांनी मात्र कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले. प्रताप सरनाईक आल्याचे घराजवळ पोहोचल्यानंतर समजले आणि आपण त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरनाईक आणि आपले वैयक्तिक संबंध असल्याचे नमूद करताना राऊत म्हणाले की, सरनाईक यांच्या आईचे आणि आपल्या आईचे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दिवाळीचा सण असल्याने ते भेटायला येणारच. त्यात कोणतेही राजकीय संकेत नाहीत. ते घरी येतील, लाडू आणि चकली खातील, आईचा आशीर्वाद घेतील आणि निघून जातील. त्यापलीकडे या भेटीचा कोणताही अर्थ नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या विलीनीकरणाच्या चर्चांनाही राऊत यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. या भेटीचा शिवसेना विलीनीकरणाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, शिंदे गटात दोन शिंदे आहेत, ते तुम्ही शोधा, असे सूचक विधानही त्यांनी केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य राजकीय घडामोडींनंतर आता शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबतही चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, संजय राऊत आणि प्रताप सरनाईक यांच्यात यापूर्वीही संवाद झाल्याचे दिसून आले आहे. रिक्षाचालक आणि रॅपिडो बाईक टॅक्सी यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालक संघटनांच्या शिष्टमंडळाने सरनाईक यांची भेट घेतली होती. रॅपिडो बाईक टॅक्सीमुळे हजारो रिक्षाचालकांच्या रोजगारावर संकट येत असल्याचा दावा या संघटनांनी केला होता. त्यावेळी सरनाईक यांनी या प्रश्नावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या घडामोडीनंतर संजय राऊत यांनी प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचे कौतुकही केले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधील संवादाचा पूल कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मात्र, दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या या भेटीमुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये भविष्यात काही नवी राजकीय समीकरणे आकाराला येणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.