प्रवीण तरडेंचा माणुसकीचा अनोखा दिवाळी फराळ!

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
पुणे
pravin tarde
दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह, रोषणाई आणि आप्तस्वकीयांसोबत सण साजरा करण्याची लगबग सुरू होते. मात्र, अतिवृष्टी आणि शेतीच्या नुकसानीमुळे यंदा अनेक शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात आर्थिक संकटाचे सावट आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. त्यांनी यंदाची दिवाळी गुंजण मावळ परिसरातील शेतकरी बांधवांसोबत साजरी केली. एवढेच नव्हे, तर या भागातील तब्बल २५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी आणि मढेघाटाच्या पुढे असलेल्या गुंजण मावळ परिसरात प्रवीण तरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांची भेट घेत दिवाळीचा आनंद वाटला. हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या भूमीतील शेतकऱ्यांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टी आणि पिकांचे नुकसान यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या दुःखात सहभागी होऊन सणाच्या काळात त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

या उपक्रमासाठी राज देशमुख, मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स आणि अन्य सहकाऱ्यांनी सहकार्य केले. त्यांच्या मदतीतून गावातील शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. केवळ सण साजरा करण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील मुलींच्या भवितव्याचाही विचार करण्यात आला.या उपक्रमातील सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे गुंजण मावळ परिसरातील २५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. ‘माणुसकीची चळवळ’ या उपक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्ते कैलास वाणी यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला. या परिसरातील मुलींना पुण्यात शिक्षणासाठी येण्याची इच्छा असल्यास त्यांना आवश्यक आर्थिक आणि इतर स्वरूपाचे सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे केवळ आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही मुलीचे शिक्षण थांबू नये, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.

प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या उपक्रमाची माहिती दिली. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात, त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या स्वप्नांना मर्यादा येऊ नयेत, यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा हा निर्णय ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.


या सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने प्रवीण तरडे यांनी शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही महत्त्वाचे आवाहन केले आहे. आपल्या आसपासच्या गावांमध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवांची सणासुदीच्या काळात आवर्जून भेट घ्यावी. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि शक्य असेल त्या पद्धतीने मदतीचा हात पुढे करावा, असे त्यांनी सांगितले.दिवाळीचा खरा आनंद केवळ स्वतःच्या घरात दिवे लावण्यात नसून, गरजूंच्या आयुष्यातही आनंदाची ज्योत पेटवण्यात आहे, हा संदेश प्रवीण तरडे यांच्या या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे. शेतकऱ्यांसोबत सण साजरा करण्यापासून ते २५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यापर्यंतच्या या प्रयत्नामुळे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले आहे.