गोकुळच्या अध्यक्षपदाची संधी; राजेश पाटील चर्चेत

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
कोल्हापूर,
Rajesh Patil in the running for Gokul chairmanship कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होत असून, या पदासाठी महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांना संधी दिली आहे. दुसरीकडे, सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबाराच्या सुमारास गोकुळ दूध संघालगतच्या गोकुळ चौक परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोनच्या सुमारास संघाच्या नव्या अध्यक्षांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राजेश पाटील यांच्या नावाची चर्चा होत असून, त्यांच्या राजकीय प्रवासाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
 

gokul 
 
राजेश पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील यांनीही याच मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे राजेश पाटील यांना राजकीय वारसा लाभला आहे. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत डोक्यावर फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला. हा निकाल राष्ट्रवादी काँग्रेससाठीही धक्कादायक ठरला होता. या पराभवाची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती. अजित पवार यांनीही कोल्हापूर दौऱ्यादरम्यान फेटा बांधून घेतला नसल्याचे सांगितले जाते.
 
 
गोकुळच्या मागील निवडणुकीतही राजेश पाटील यांच्या पत्नी आणि संजय मंडलिक यांचे पुत्र यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राजेश पाटील हे संजय मंडलिक यांचे मेहुणे आहेत. या पराभवानंतर मंडलिक गटाकडून हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही गटांमधील मतभेद चर्चेत आले होते. मात्र, आता हसन मुश्रीफ यांच्या गटाकडूनच राजेश पाटील यांना गोकुळच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळाल्याने जुन्या वादावर पडदा पडल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेश पाटील यांना संधी मिळते का, याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.