लंडन
russell brand मनोरंजनविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ब्रिटिश कॉमेडियन आणि अभिनेता रसेल ब्रँड याला बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले असून, न्यायालयाने त्याला दहा वर्षांहून अधिक काळाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल दोन दशकांपूर्वी घडलेल्या घटनांशी संबंधित या प्रकरणाचा निकाल लागल्याने मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ५१ वर्षीय रसेल ब्रँडवरील आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत.

लंडनमधील साउथवार्क क्राउन कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. निकाल देताना न्यायाधीश जोएल बेनाथन यांनी ब्रँडच्या वर्तनावर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी त्याचे वर्णन 'प्रिडेटर' अर्थात शिकारी वृत्तीची व्यक्ती असे केले. तसेच पीडित महिलांप्रती त्याने अत्यंत उद्धट आणि तिरस्कारपूर्ण वर्तन केल्याचे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. शिक्षा सुनावली जात असताना रसेल ब्रँडच्या चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिसून आली नाही.
न्यायालयाने गेल्या आठवड्यातच २००४ ते २००९ या कालावधीत चार वेगवेगळ्या महिलांशी संबंधित बलात्काराच्या एका आणि लैंगिक अत्याचाराच्या तीन प्रकरणांमध्ये ब्रँडला दोषी ठरवले होते. या प्रकरणातील घटनांमुळे पीडित महिलांना मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागल्याचेही सुनावणीदरम्यान समोर आले.
बचाव पक्षाकडून बदललेल्या आयुष्याचा युक्तिवाद
रसेल ब्रँडच्या वतीने वकील इयान विंटर यांनी न्यायालयात बाजू मांडली. ब्रँड आता पूर्वीचा राहिलेला नसून त्याच्या व्यक्तिमत्त्वात मोठा बदल झाला आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. पूर्वी ब्रँडला मद्य आणि अंमली पदार्थांचे व्यसन होते. मात्र, या व्यसनांवर मात केल्याबाबत तो सार्वजनिकपणे बोलत आला आहे, असेही वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सुनावणीदरम्यान एका पीडित महिलेचा जबाबही वाचून दाखवण्यात आला. या घटनेचा मानसिक आघात आजही तिच्या मनात कायम असून, त्या आठवणींमुळे ती थरथर कापते, असे तिच्या जबाबातून स्पष्ट झाले. तिच्यासाठी हा अनुभव कधीही न संपणाऱ्या दुःस्वप्नासारखा असल्याचे सांगण्यात आले.
अन्य दोन आरोपांचीही पोलिसांकडून चौकशी
दरम्यान, रसेल ब्रँडविरोधातील प्रकरणांची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराच्या अन्य दोन कथित आरोपांची चौकशी अद्याप सुरू आहे. यातील एका प्रकरणात घटना घडली, त्यावेळी संबंधित पीडिता अवघ्या १६ वर्षांची होती, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणांच्या तपासादरम्यान आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
रसेल ब्रँड याची मनोरंजन क्षेत्रातील कारकीर्दही मोठी राहिली आहे. 'फॉरगेटिंग सारा मार्शल', 'गेट हिम टू द ग्रीक' आणि 'आर्थर' यांसारख्या चित्रपटांमधून त्याने अभिनय केला आहे. विनोदी कलाकार आणि अभिनेता म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या ब्रँडला गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आल्याने त्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. दोन दशकांपूर्वीच्या घटनांशी संबंधित या प्रकरणातील न्यायालयीन निर्णयामुळे मनोरंजनविश्वात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.