अफगाणिस्तानविरुद्ध स्कॉटलंडचा बहिष्कार!

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
एडिनबर्ग,
scotland-boycotts-afghanistan अफगाणिस्तानमधील महिलांच्या आणि मुलींच्या अधिकारांवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. तालिबान सरकारच्या धोरणांचा निषेध करत क्रिकेट स्कॉटलंडने अफगाणिस्तानविरुद्ध द्विपक्षीय क्रिकेट सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे दोन्ही संघांची गाठ केवळ आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांमध्ये किंवा आवश्यकतेनुसार सराव सामन्यांमध्येच पडणार आहे.
 
scotland-boycotts-afghanistan
 
क्रिकेट स्कॉटलंडने आपल्या पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले, तरी त्याचा अर्थ अफगाणिस्तान सरकारच्या धोरणांना किंवा भूमिकेला पाठिंबा दिला असा होत नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. अफगाणिस्तानमधील महिलांना क्रिकेट खेळण्याचा अधिकार आणि मूलभूत मानवी हक्क मिळेपर्यंत त्यांच्याविरुद्ध द्विपक्षीय सामने आयोजित केले जाणार नसल्याचेही क्रिकेट स्कॉटलंडने म्हटले आहे.
 
अफगाणिस्तानच्या आयर्लंड दौऱ्याआधी सरावासाठी स्कॉटलंडमधील सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने केली होती. मात्र, ही मागणी उशिरा करण्यात आली आणि उपलब्ध जागेची कमतरता असल्याने ती मान्य होऊ शकली नाही. या घटनेनंतर स्कॉटिश मंडळाने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डासोबतच्या संबंधांचा आढावा घेतला. अफगाणिस्तान प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेत स्कॉटलंडचे खेळाडू सहभागी होऊ शकतात का, याचाही विचार या प्रक्रियेत करण्यात आला.
 
दरम्यान, अफगाणिस्तान प्रीमियर लीगच्या ड्राफ्टमध्ये स्कॉटलंडचा सलामीवीर जॉर्ज मुन्सी याची निवड झाली आहे. मात्र, या स्पर्धेला आयसीसीची अधिकृत मान्यता मिळेपर्यंत त्याला खेळण्यासाठी एनओसी दिली जाणार नसल्याचे क्रिकेट स्कॉटलंडने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर स्कॉटलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. मात्र, २०२४ आणि २०२६ च्या टी-२० विश्वचषकांपूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते.
यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही अफगाणिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका न खेळण्याची भूमिका घेतली आहे. महिलांच्या हक्कांशी संबंधित मुद्द्यांमुळे या दोन्ही मंडळांनी अफगाणिस्तानविरुद्ध केवळ आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आता क्रिकेट स्कॉटलंडनेही अशीच भूमिका घेतल्याने अफगाणिस्तान क्रिकेटसमोरील आंतरराष्ट्रीय आव्हानांमध्ये आणखी भर पडली आहे.