सँडपेपर प्रकरणावर स्टार्कचे मौन अखेर सुटले!

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
sandpaper-incident २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवून सोडणारे सँडपेपर प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा याने आपल्या नव्या आत्मचरित्रातून या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. त्यानंतर क्रिकेटविश्वात विविध प्रतिक्रिया उमटत असताना ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाला आठ वर्षे उलटली असली तरी आपले मत आजही पूर्वीप्रमाणेच असल्याचे त्याने सांगितले.
 
sandpaper-incident
 
स्टार्कच्या मते, चेंडूशी छेडछाड करण्यासाठी सँडपेपरचा वापर केला जात असल्याची माहिती गोलंदाजांना नव्हती. उस्मान ख्वाजाच्या पुस्तकातील दाव्यांवर आपण विशेष लक्ष दिले नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. २०२१ मध्ये या प्रकरणाबाबत जे स्पष्टीकरण दिले होते, त्यावर आपण आजही ठाम असल्याचे स्टार्कने सांगितले.
 
या प्रकरणात यापूर्वी कॅमेरून बँक्रॉफ्ट याने एका मुलाखतीत गोलंदाजांनाही चेंडूशी छेडछाड होत असल्याची माहिती असावी, असे संकेत दिले होते. त्यानंतर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले होते. मैदानावर चेंडूशी छेडछाड करण्यासाठी कोणती वस्तू आणली जात आहे, याची आपल्याला कल्पना नव्हती, असे त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.
 
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, स्टार्कने या विषयावर बोलताना आठ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांबाबत वेगवेगळी मते मांडली जात असल्याचे सांगितले. मात्र, २०२१ मध्ये दिलेल्या निवेदनातील भूमिका बदललेली नसल्याचे त्याने पुन्हा अधोरेखित केले. इतर गोलंदाजांच्या वतीने आपण बोलू शकत नसल्याचेही त्याने स्पष्ट केले.
 
दरम्यान, उस्मान ख्वाजा याचे आत्मचरित्र १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाले. या पुस्तकात २०१८ मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान घडलेल्या सँडपेपर प्रकरणाचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. केपटाऊन कसोटीबरोबरच त्याआधी गकेबेर्हा येथे झालेल्या सामन्याशी संबंधित घटनांवरही त्याने भाष्य केले आहे.
 
ख्वाजाने या पुस्तकातील मजकुरामुळे निर्माण झालेल्या चर्चेवर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरणही दिले आहे. कोणालाही अडचणीत आणणे किंवा कोणावर आरोप करणे हा आपला हेतू नसल्याचे त्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये चर्चा सुरू झाली आहे.