सूरज चव्हाणच्या ‘लाडक्या लक्ष्मी’ची पहिली झलक!

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
मुंबई
suraj chavan
‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता आणि सोशल मीडियावर ‘गुलिगत’ या नावाने लोकप्रिय झालेला सूरज चव्हाण सध्या एका खासगी आयुष्यातील आनंदाच्या क्षणामुळे चर्चेत आला आहे. दिवाळीच्या निमित्ताने सूरजने पहिल्यांदाच आपल्या चिमुकल्या लेकीचा चेहरा चाहत्यांसमोर आणला आहे. पत्नी संजना आणि मुलगी राधासोबत त्याने लक्ष्मीपूजन केले. या पूजेचे खास व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले असून, त्याला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. राधाची पहिली झलक पाहून नेटकरी तिच्या गोंडस रूपाचे कौतुक करत आहेत.



सूरजने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर लक्ष्मीपूजनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या मांडीवर चिमुकल्या राधाला घेऊन बसलेला दिसतो. विशेष म्हणजे, आतापर्यंत चाहत्यांना न दाखवलेला लेकीचा चेहरा त्याने याच व्हिडीओच्या माध्यमातून पहिल्यांदाच उघड केला आहे. राधाची एक झलक पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून उत्सुक होते. त्यामुळे हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली.

या व्हिडीओला सूरजने ‘माझी लाडूबाई, माझी लाडाची लक्ष्मीचे लक्ष्मीपूजन’ असे भावनिक कॅप्शन दिले आहे. मुलीच्या आगमनामुळे आपल्या आयुष्यात आलेला आनंद त्याने या पोस्टमधून व्यक्त केला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सूरजने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये लक्ष्मीपूजनातील एक खास कौटुंबिक विधी पाहायला मिळतो. यावेळी पत्नी संजना पाटावर बसलेली असून तिच्या मांडीवर चिमुकली राधा आहे. सूरज सर्वप्रथम आपल्या लेकीचे पाय पाण्याने धुतो. त्यानंतर तिच्या पायांना हळद-कुंकू लावून फुले अर्पण करतो आणि विधिवत पूजा करतो. पुढे लेकीचे औक्षण करून तिच्याविषयीचे प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करतो. मुलीला घरातील लक्ष्मी मानून केलेला हा विधी चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

यानंतर सूरज पत्नी संजनाचेही पाय धुतो. तिच्या पायांना हळद-कुंकू लावून फुले वाहतो आणि औक्षण करतो. एवढेच नव्हे, तर तो संजनाच्या पाया पडून तिचे आशीर्वादही घेतो. पत्नी आणि मुलीप्रती आदर, प्रेम व्यक्त करणारा हा प्रसंग पाहून नेटकऱ्यांनी सूरजचे कौतुक केले आहे. त्याची मानलेली बहीण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिनेही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमची लक्ष्मी’ अशी कमेंट करत तिने चिमुकल्या राधावरील आपले प्रेम व्यक्त केले. इतर चाहत्यांनीही राधाच्या गोंडस रूपाचे कौतुक करत सूरज आणि संजना यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, सूरज चव्हाणने २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संजनासोबत विवाह केला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली. अखेर ४ सप्टेंबर २०२६ रोजी संजनाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जन्माष्टमीच्या दिवशी कन्यारत्न प्राप्त झाल्यामुळे सूरजने आपल्या मुलीचे नाव राधा ठेवले. आता दिवाळीच्या निमित्ताने राधाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर करत सूरजने आपल्या आनंदात चाहत्यांनाही सहभागी करून घेतले आहे.