कच्चे घर कोसळून चिमुरडीसह तिघांचा मृत्यू

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
भोपाळ,
Three die as house collapses मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात कच्चे घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. सोमवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जिल्हा मुख्यालयापासून जवळपास २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बरहापन गावातील जलहथानी टोला परिसरात ही दुर्घटना घडली. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या गावात कुटुंबातील सर्व सदस्य घरात झोपले असताना अचानक संपूर्ण घर कोसळले. काही क्षणांतच घराचे मातीचे बांधकाम ढिगाऱ्यात रूपांतरित झाले आणि घरातील सदस्य त्याखाली दबले गेले.
 
 
 
Three die as house collapses
 
या दुर्घटनेत अरुण विश्वकर्मा (३६), त्यांची आई सतुलिया देवी (६५) आणि दोन वर्षांची मुलगी पुष्पा यांचा मृत्यू झाला. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिमन्यू द्विवेदी यांनी मृतांची ओळख पटवली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पोकलेन मशीनच्या साहाय्याने बचावकार्य हाती घेण्यात आले. या मोहिमेदरम्यान चार जखमी सदस्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतदेहांचा पंचनामा केल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अभिमन्यू द्विवेदी यांनी दिली.
 
 
या घटनेबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाला नवीन घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळाली होती. या निधीच्या माध्यमातून घराचे बांधकाम सुरू होते. मात्र, बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच ही दुर्दैवी दुर्घटना घडली. नव्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.