Today is Diwali Padwa महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत विशेष स्थान असलेला दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा आज, १० नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या या दिवशी पती-पत्नीमधील प्रेम, विश्वास आणि परस्पर आदराचे नाते अधिक दृढ करण्याची परंपरा आहे. या निमित्ताने पत्नी पतीचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि यशाची प्रार्थना करते. त्यानंतर पती पत्नीला भेटवस्तू, दागिने किंवा वस्त्र देऊन तिच्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करतो. व्यापारी वर्गासाठीही हा दिवस शुभ मानला जातो. नवविवाहित जोडप्यांसाठी तर पहिल्या दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व असते.
हिंदू पंचांगानुसार, यंदा प्रतिपदा तिथी ९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी सुरू झाली असून १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता समाप्त होत आहे. प्रतिपदेचा सूर्योदय १० नोव्हेंबरला होत असल्याने याच दिवशी पाडवा साजरा केला जात आहे. पतीचे औक्षण करण्यासाठी सकाळी १० वाजून ५७ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत शुभ चौघडिया मुहूर्त आहे. तर अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत आहे. या दोन्ही मुहूर्तांचा समान कालावधी लक्षात घेता, सकाळी ११ वाजून ५९ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत औक्षण करता येईल. मात्र, शहरानुसार सूर्योदयाच्या वेळेत फरक असल्याने स्थानिक पंचांग किंवा पुरोहितांच्या सल्ल्याने अंतिम मुहूर्त निश्चित करावा.
पाडव्याच्या दिवशी घराची स्वच्छता करून प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढली जाते. देवघरात दिवा प्रज्वलित करून भगवान विष्णू आणि बळीराजाचे स्मरण केले जाते. त्यानंतर पतीला पाटावर किंवा आसनावर बसवून औक्षणाची तयारी केली जाते. ताटात निरांजन, अक्षता, हळद-कुंकू, फुले आणि मिठाई ठेवली जाते. पत्नी पतीच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावून निरांजनाने ओवाळते आणि अक्षता लावून त्याच्या दीर्घायुष्याची, आरोग्याची तसेच सुखी संसाराची प्रार्थना करते. औक्षणानंतर पती पत्नीला भेटवस्तू देतो. कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन हा सण साजरा केला जातो. अशा पारंपरिक विधींमधून पती-पत्नीमधील प्रेम, आपुलकी आणि समर्पणाची भावना व्यक्त होते.