ऋषभ पंतच्या पुनरागमनाची प्रतीक्षा संपणार?

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
rishabh-pant न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेआधी भारतीय संघासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या पुनरागमनाच्या आशा वाढल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याची अंतिम फिटनेस आणि सामन्यासाठीच्या तयारीची चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीत यशस्वी ठरल्यास त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यासाठी वैद्यकीय पथकाची मंजुरी मिळू शकते.

rishabh-pant 
 
क्रिकबझच्या वृत्तानुसार, पंतने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव सुरू ठेवला असून, त्याची कामगिरी समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे. नेट्समध्येही तो सहजपणे फलंदाजी करताना दिसला आहे. त्यामुळे १२ नोव्हेंबरची चाचणी त्याच्या पुनरागमनाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. या चाचणीत तो उत्तीर्ण झाल्यास पहिल्या कसोटी सामन्यापूर्वीच न्यूझीलंडमध्ये दाखल होऊन भारतीय संघात सहभागी होऊ शकतो.
 
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळवला जाईल. तर मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना २७ नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे होणार आहे.
 
दरम्यान, या मालिकेपूर्वी इंडिया 'अ' संघाच्या तीन सामन्यांसाठीही पंतची निवड करण्यात आली होती. मात्र, फिटनेसची परवानगी न मिळाल्याने त्याला एकाही सामन्यात खेळता आले नाही. श्रीनगर येथे रेस्ट ऑफ इंडिया आणि जम्मू-काश्मीर यांच्यात झालेल्या इराणी कप सामन्यादरम्यान त्याच्या बरगडीला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला इंडिया 'अ' संघातून माघार घ्यावी लागली आणि त्याने सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन सुरू ठेवले.
 
श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर पंतने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे आता १२ नोव्हेंबरच्या चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चाचणीत वैद्यकीय पथकाकडून हिरवा कंदील मिळाल्यास न्यूझीलंड दौऱ्यात पंतच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.