विराटशी संवादानंतर विल्यमसनचा निवृत्तीचा निर्णय!

    दिनांक :10-Nov-2026
Total Views |
वेलिंग्टन,
williamsons-retirement-decision न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयामागील एक महत्त्वाचा प्रसंग उघड केला आहे. निवृत्ती जाहीर करण्याच्या अवघ्या एक दिवस आधी त्याने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीशी संवाद साधला होता. या चर्चेदरम्यान विराटशी बोलताना आपल्याला आरशात स्वतःशीच संवाद साधत असल्यासारखे वाटले, असे विल्यमसनने सांगितले. या चर्चेमुळे त्याला कारकीर्दीचा पुढील टप्पा ठरवण्यासाठी आवश्यक असलेली स्पष्टता मिळाली.
 
williamsons-retirement-decision
 
पीटीआयच्या वृत्तानुसार, 'बिटवीन द टू बेअर्स' या पॉडकास्टमध्ये बोलताना विल्यमसनने विराटसोबत झालेल्या संवादाचा अनुभव सांगितला. दोघांनीही एकाच क्रिकेटच्या युगात कारकीर्द घडवली असून, अनेक महत्त्वाचे टप्पे एकत्र अनुभवले आहेत. विशेष म्हणजे कर्णधारपदाची जबाबदारी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आव्हाने आणि कौटुंबिक आयुष्यातील बदल याबाबतीतही दोघांचे अनुभव बऱ्याच अंशी सारखे आहेत.
 
विल्यमसनच्या मते, संघातील इतर सहकाऱ्यांना एखाद्या खेळाडूची परिस्थिती पूर्णपणे समजेलच असे नाही. मात्र, विराटसोबत बोलताना त्याला स्वतःच्या अनुभवांचे प्रतिबिंब दिसले. दोघांमध्ये काही वैयक्तिक आणि कठीण विषयांवरही मनमोकळा संवाद झाला. ही चर्चा संपवून त्याने फोन ठेवल्यानंतर पत्नी खोलीत आली. त्यावेळी आपण क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या योग्य टप्प्यावर पोहोचलो असल्याचे त्याने पत्नीला सांगितले.
 
१० हजार धावांचा टप्पा गाठण्याची इच्छा नव्हती
कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण करणे हे आपले वैयक्तिक उद्दिष्ट कधीच नव्हते, असेही विल्यमसनने स्पष्ट केले. त्याने आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये नऊ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. मात्र, केवळ विक्रम करण्यासाठी किंवा चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी क्रिकेट खेळणे योग्य नसल्याचे त्याचे मत आहे. विराटसोबतच्या चर्चेतील एका महत्त्वाच्या मुद्द्याचाही त्याने उल्लेख केला. अनेकदा खेळाडूंचे खेळावरील मूळ प्रेम आणि आवड मागे पडते आणि एखादा विशिष्ट विक्रम किंवा टप्पा गाठण्याच्या ध्येयाभोवती त्यांचा खेळ केंद्रित होतो, असे विराटने सांगितल्याचे विल्यमसनने नमूद केले.
 
न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा
केन विल्यमसनने जून २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या कारकिर्दीत त्याने न्यूझीलंडसाठी अनेक विक्रम नोंदवले. एकूण १९ हजार ३४६ आंतरराष्ट्रीय धावांसह तो न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याच्या नावावर ४८ शतके आणि सहा द्विशतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विल्यमसनने ९ हजार ५१५ धावा केल्या. दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला आणखी ४८५ धावांची गरज होती. मात्र, हा टप्पा गाठण्याऐवजी त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. दुसरीकडे, विराट कोहलीने ९ हजार २३० कसोटी धावा केल्यानंतर २०२५ मध्ये या प्रकारातून निवृत्ती घेतली होती.