यवतमाळ
geet bagde घरातून सुरू झालेला संगीताचा प्रवास आता राष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून, यवतमाळच्या गीत प्रशांत बागडे हिने आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर देशभरातील संगीतप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी प्रतिष्ठित ‘सारेगामापा २०२६’ या गायन रिअॅलिटी शोमध्ये तिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, झी टीव्हीवरील या पर्वात महाराष्ट्रातून निवड झालेली ती एकमेव गायिका असून, सलग तीन आठवडे ‘परफॉर्मन्स ऑफ द वीक’चा बहुमान मिळविण्याची कामगिरी तिने केली आहे.

देशभरातील प्रतिभावान गायकांना संधी देणाऱ्या या स्पर्धेत १६ ते ४० वर्षे वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. या सर्वांमध्ये गीत सर्वांत तरुण स्पर्धक आहे. कमी वय असूनही आपल्या गायनकौशल्याने तिने परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या पर्वात शंकर महादेवन, कुमार सानू, नीती मोहन आणि जावेद अली यांसारख्या दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन स्पर्धकांना मिळत आहे. भव्य ३६० अंशांच्या मंचावर शंभरहून अधिक लाइव्ह वादक आणि कोरस समूहाच्या साथीने गीत आपली कला सादर करीत आहे.
गीतच्या गायनातील वैविध्य हे तिचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया, जुन्या हिंदी चित्रपटगीतांची जाण, सुगम संगीताची भावपूर्णता आणि पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव अशा विविध शैलींमध्ये ती सहजपणे गाते. याशिवाय, योडलिंग या वेगळ्या गायनतंत्रावरही तिचे प्रभुत्व आहे. त्यामुळे तिच्या सादरीकरणाची विशेष दखल घेतली जात आहे.
एस. डी. बर्मन आणि आर. डी. बर्मन यांच्या अजरामर गीतांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित विशेष भागात गीतने ‘सर जो तेरा चकराये’ आणि ‘चला जाता हूँ’ ही गाणी सादर केली. तिच्या या सादरीकरणाला चारही परीक्षकांनी उभे राहून दाद दिली. नीती मोहन यांनी तिच्या योडलिंगचे विशेष कौतुक केले. तसेच ‘ईना मीना डीका’ या गाण्याच्या सादरीकरणावेळी कुमार सानू यांच्यासोबत झालेली तिची जुगलबंदीही लक्षवेधी ठरली. प्रेक्षकांच्या मतदानातून निवडल्या जाणाऱ्या ‘झी५ व्ह्यूअर्स चॉईस परफॉर्मन्स ऑफ द वीक’ या पुरस्कारावर गीतने सलग तीन आठवडे आपले नाव कोरले.
गीतच्या या यशामागे बालपणापासून मिळालेले संगीताचे संस्कार आणि कठोर मेहनत आहे. तिचे वडील प्रा. डॉ. प्रशांत बागडे हे यवतमाळ येथील दाते महाविद्यालयात प्राध्यापक असून, त्यांचा संगीत क्षेत्राशीही संबंध आहे. त्यांनीच गीतला संगीताचे प्राथमिक धडे दिले. गीत सध्या याच महाविद्यालयात कला शाखेच्या अकरावीत शिकत आहे. पुढे अमरावती येथील डॉ. परशुराम कांबळे आणि डॉ. गीतांजली कांबळे यांच्याकडे तिने दोन वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. सध्या मुंबईतील रमाश्री गुरुकुलमध्ये पं. रमाकांत गायकवाड आणि भाग्यश्री पांचाळे (गायकवाड) यांच्याकडे ती संगीताचे प्रशिक्षण घेत आहे.
गीतने यापूर्वीही गायनाच्या क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. २०२३ मध्ये ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’च्या अंतिम सहा स्पर्धकांमध्ये तिने स्थान मिळविले होते. त्यानंतर २०२४ मध्ये स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या स्पर्धेची ती महाविजेती ठरली. ‘प्रेमाची गोष्ट २’ या मराठी चित्रपटातील ‘आपली यारी’ या गाण्यासाठी तिने पार्श्वगायनही केले आहे.
गीतच्या यशस्वी वाटचालीत आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. वडील प्रशांत बागडे यांनी तिला संगीताचे प्राथमिक धडे देण्यासोबतच सातत्याने मार्गदर्शन केले. तर आई रंजना बागडे यांनी मुलीच्या संगीत कारकिर्दीला प्राधान्य देत स्वतःला मिळालेल्या नोकरीचाही त्याग केला. गीतच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी खंबीरपणे साथ दिली.
‘मुलीला एवढ्या मोठ्या मंचावर गाताना पाहणे हा अभिमानाचा क्षण आहे. मात्र, तिच्या प्रत्येक सुरामागे असलेली मेहनत, संघर्ष आणि त्याग आठवतो. अवघ्या सोळाव्या वर्षी ती केवळ स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटत नाही, तर मलाही जिद्द आणि चिकाटीचा अर्थ शिकवत आहे. ती कितीही उंच भरारी घेऊन दूर पोहोचली, तरी माझ्यासाठी ती कायम माझी छोटीशी परीच राहील,’ अशा भावना गीतचे वडील प्रा. डॉ. प्रशांत बागडे यांनी व्यक्त केल्या.
यवतमाळच्या मातीतून पुढे आलेला गीतचा आवाज आज राष्ट्रीय संगीत मंचावर घुमत आहे. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मिळविलेली ही कामगिरी तिच्या कुटुंबासह संपूर्ण यवतमाळकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तिच्या या सुरेल प्रवासातून भविष्यात भारतीय संगीतविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.