दिगारू स्थानकावर रेल्वेगाडी रुळावरून घसरली; बचावकार्य सुरू

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
गुवाहाटी,
A train derailed at Digaru station. आसाममध्ये बुधवारी (११ नोव्हेंबर) पहाटे मोठा रेल्वे अपघात घडला. गुवाहाटीच्या बाहेरील भागातील दिगारू परिसरात कोलकाता-सैरांग एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले. मिझोरामहून कोलकात्याकडे जाणाऱ्या या प्रवासी गाडीच्या इंजिनासह सात डबे रुळावरून घसरल्याची सुरुवातीची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 

56576 
 
 
 
पूर्वोत्तर सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ६ वाजून ५४ मिनिटांनी दिगारू रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. दुसऱ्या रेल्वेगाडीला मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी ट्रेन क्रमांक १३१२५ कोलकाता-सैरांग एक्स्प्रेस थांबविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्यावेळी लोको पायलटला गाडीचा वेग नियंत्रित करता आला नाही. परिणामी, रेल्वेचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, याच वेळी त्यांनी सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नसल्याचा दावाही केला. प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेगाडीच्या माध्यमातून त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
 
 
अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह अन्य अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. उत्तर सीमांत रेल्वेच्या वतीने मदतकार्याकरिता विशेष बचाव गाडीही पाठविण्यात आली आहे. पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी तैनात आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात येत आहेत.