अभिषेक बॅनर्जींच्या समर्थकाच्या घरावर प्रशासनाचा हातोडा!

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
परगणा,
Abhishek Banerjee's supporter पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे नेते जहांगीर खान यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या जहांगीर खान यांच्या फलता येथील घरावर जिल्हा प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. या ठिकाणी कथित अनधिकृत बहुमजली इमारत उभारण्यात आल्याचा आरोप असून, बांधकामातील नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. दक्षिण २४ परगण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार घर पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान घटनास्थळी पोलीस अधिकारीही उपस्थित आहेत.
 
 
Abhishek Banerjee
 
 
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे समर्थक आणि निकटवर्तीय म्हणून जहांगीर खान यांची ओळख आहे. फलता येथील त्यांच्या घरावर कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने घरातील फर्निचर आणि इतर साहित्य बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मजुरांच्या मदतीने इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. बांधकामातील कथित अनियमिततेमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तुरुंगात असतानाच जहांगीर खान यांना आणखी एका मोठ्या प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, हे घर पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जाणार नाही. जहांगीर खान यांच्या घरापर्यंत पोहोचणारा रस्ता अतिशय अरुंद असल्याने तिथे बुलडोझर नेणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यंत्रांऐवजी मजुरांच्या माध्यमातूनच घर पाडण्याचे काम केले जाणार आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.