हिमालयीन आकाशात भारतीय लढाऊ विमानांचा सराव; हवाई क्षेत्रावर निर्बंध

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Exercise by Indian combat aircraft चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) भारतीय हवाई दल आपली युद्धसज्जता अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये १३ ते २१ नोव्हेंबरदरम्यान आठवडाभराचा मोठा हवाई युद्धाभ्यास आयोजित करण्यात येणार आहे. या सरावासाठी संबंधित हवाई क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात आले असून, त्यासंदर्भात NOTAM म्हणजेच हवाई क्षेत्राबाबतची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. या युद्धाभ्यासाच्या माध्यमातून संभाव्य हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची क्षमता आणि प्रतिकूल परिस्थितीत कामगिरी करण्याची तयारी तपासली जाणार आहे. विशेषतः हिमालयीन प्रदेशातील आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत भारतीय हवाई दल किती प्रभावीपणे कारवाई करू शकते, याची चाचणी या सरावात घेतली जाणार आहे.
 
 
combat aircraft
 
या युद्धाभ्यासात भारतीय हवाई दलाची प्रमुख लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. उंच पर्वतीय भागात विमानांचा वेग, दूर अंतरावरून लक्ष्याचा वेध घेण्याची बीव्हीआर (Beyond Visual Range) क्षमता आणि अधिक उंचीवर इंजिनची कार्यक्षमता यांची चाचणी घेतली जाणार आहे. भारताच्या पूर्व आणि उत्तर सीमावर्ती भागांच्या तुलनेत कमी चर्चेत असलेल्या 'मिडल सेक्टर'मध्ये गेल्या काही काळात हवाई तळ, पायाभूत सुविधा आणि देखरेख यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रगत लँडिंग ग्राउंड्सचा वापर, एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात सैनिकांची वेगाने वाहतूक आणि आवश्यक रसद पोहोचविण्याची क्षमता यांचाही आढावा घेतला जाणार आहे.
 
 
या सरावाचा परिणाम काही नियमित नागरी विमानांच्या उड्डाण मार्गांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिक विमान कंपन्यांना भारतीय हवाई दलाशी आधीच समन्वय साधून उड्डाणांचे वेळापत्रक आणि मार्ग निश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, NOTAM म्हणजे हवाई क्षेत्रासंदर्भात विमानचालक आणि विमान कंपन्यांना दिली जाणारी अधिकृत सूचना होय. लष्करी सराव, क्षेपणास्त्र चाचण्या, एअर शो किंवा सुरक्षेच्या कारणास्तव एखाद्या विशिष्ट हवाई क्षेत्रात ठरावीक कालावधीसाठी निर्बंध लागू करायचे असल्यास अशी सूचना जारी केली जाते. यामुळे वैमानिकांना संभाव्य बदलांची आधीच माहिती मिळते आणि विमानांचे मार्ग व वेळापत्रक सुरक्षितपणे नियोजित करता येते.