नवी दिल्ली,
Gill on top, Kohli third आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिलने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान ही नवी क्रमवारी जाहीर करण्यात आली. गिलच्या रेटिंगमध्ये घट झाली असली तरी अव्वल स्थानाला सध्या कोणताही धोका निर्माण झालेला नाही. यापूर्वी ८४१ रेटिंग असलेल्या गिलची रेटिंग आता ८२२ झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो खातेही न उघडता बाद झाला होता. त्यामुळे त्याच्या गुणांवर परिणाम झाला. दुसरीकडे, न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल ७९४ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. गिल आणि मिचेल यांच्यातील अंतर कायम असल्याने भारतीय कर्णधाराचे अव्वल स्थान सध्या सुरक्षित मानले जात आहे.

या क्रमवारीतील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सुरू असलेली चढाओढ. विराट कोहली ७८१ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर रोहित शर्मा ७५४ रेटिंग मिळवत चौथ्या क्रमांकावर कायम आहे. दोघांच्या गुणांमधील अंतर तुलनेने कमी असल्याने आगामी सामन्यांतील कामगिरीमुळे क्रमवारीत बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शुभमन गिल उर्वरित दोन सामन्यांत खेळणार नसून कसोटी मालिकेच्या तयारीसाठी संघातून बाहेर पडणार आहे. मात्र, विराट आणि रोहित हे दोघेही उर्वरित सामन्यांत खेळताना दिसतील. त्यामुळे मोठी खेळी करण्याची संधी या दोन्ही अनुभवी फलंदाजांकडे असेल. दुसरीकडे, डॅरिल मिचेलही मालिकेतील पुढील सामने खेळणार असल्याने त्याच्याकडेही गुणांमध्ये वाढ करण्याची संधी आहे.
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला मात्र ताज्या क्रमवारीत एका स्थानाचा फटका बसला आहे. ६०८ रेटिंगसह तो आता १८ व्या क्रमांकावर घसरला आहे. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत उर्वरित दोन सामन्यांसाठी श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याला फलंदाजीमध्ये वरच्या क्रमांकावर संधी मिळाल्यास मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत दोन सामने जिंकून आघाडी मिळवली आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा सामना शुक्रवारी होणार आहे. या सामन्यातील कामगिरीचा परिणाम आगामी आयसीसी क्रमवारीवरही होऊ शकतो.