सहा महिने केदारनाथचे दरवाजे बंद; आता उखीमठमध्ये होणार दर्शन!

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
डेहराडून
Kedarnath doors closed for six months उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ धामाचे दरवाजे बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेच्या पवित्र पर्वावर हिवाळ्यासाठी बंद करण्यात आले. वैदिक मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या वातावरणात सकाळी ८.३० वाजता मंदिराचे मुख्य दरवाजे पुढील सहा महिन्यांसाठी बंद करण्यात आले. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी देश-विदेशातून हजारो भाविक केदारनाथ येथे दाखल झाले होते. मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर भगवान केदारनाथ यांच्या चल विग्रह उत्सवमूर्तीची पालखी हिवाळी वास्तव्यासाठी उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिराच्या दिशेने रवाना झाली. त्यामुळे आता हिवाळ्याच्या कालावधीत भाविकांना बाबांचे दर्शन उखीमठ येथे घेता येणार आहे.
 
 
 
Kedarnath doors
 
मंदिराचे मुख्य पुजारी गंगाधर लिंग महाराज यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, दरवाजे बंद करण्याची धार्मिक प्रक्रिया पहाटेपासूनच सुरू झाली होती. सर्वप्रथम भगवान शिवांचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर विशेष पूजाविधी पार पडला आणि देवाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. धार्मिक परंपरेनुसार भगवान शिवांना समाधी स्वरूप देण्यात आल्यानंतर सकाळी ठीक ८.३० वाजता मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. त्यानंतर लष्करी बँडच्या सुरेल धून आणि 'जय बाबा केदार'च्या जयघोषात उत्सवमूर्तीची पालखी उखीमठकडे मार्गस्थ झाली. विविध मुक्कामांवरून प्रवास करत ही पालखी ओंकारेश्वर मंदिरात पोहोचणार असून, संपूर्ण हिवाळ्यात तेथे नियमित पूजा-अर्चा केली जाणार आहे.
 
 
दरम्यान, पालखीच्या प्रवासासाठी आणि मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. रुद्रप्रयागच्या पोलीस अधीक्षक निहारिका तोमर यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, पालखीसोबत गार्ड ऑफ ऑनर आणि फिरते पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. हिवाळ्यात केदारनाथ धामच्या सुरक्षेसाठी उत्तराखंड पोलिसांसोबत भारत-तिबेट सीमा पोलीस दलाची (ITBP) एक तुकडीही तैनात राहणार आहे. तसेच उखीमठ येथे भाविकांच्या हिवाळी यात्रेदरम्यान वाहतूक आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था केली जाणार आहे. भाविकांनी हिवाळ्यातील दर्शनासाठी ओंकारेश्वर मंदिरात यावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे. आता २०२७ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केदारनाथ धामचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार आहेत.