मुंबई
ganesh naik राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानाला बुधवारी सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. दक्षिण मुंबईतील 'पावनगड' या बंगल्यात सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. बंगल्यातून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागल्याने अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

मंत्रालयासमोर मंत्र्यांसाठी शासकीय निवासस्थाने आहेत. त्यापैकी गणेश नाईक यांच्या 'पावनगड' बंगल्यात बुधवारी सकाळी आग लागली. बंगल्यातील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्राथमिक तपासणीत विद्युत यंत्रणेतील दोषामुळे आग लागल्याचे आढळून आल्याची माहिती आहे.
आगीमुळे बंगल्याच्या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे काम हाती घेतले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे समोर आलेले नाही. मात्र, शासकीय निवासस्थानातच विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे आग लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत थेट राज्याच्या मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यात आग लागल्याने अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वातानुकूलित यंत्रणा किंवा विद्युत उपकरणांमधील दोष हे आगीचे कारण ठरले का, याबाबत अधिक तपासातून स्पष्टता येणार आहे.