ठाणे
mandar tillu ठाण्याच्या सांस्कृतिक आणि नाट्यविश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. बालरंगभूमीच्या माध्यमातून अनेक बालकलाकार घडविणारे ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक, निर्माते आणि गंधार कला संस्थेचे अध्यक्ष प्रा. मंदार टिल्लू यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बालरंगभूमीच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ठाण्याच्या सांस्कृतिक विश्वातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

प्रा. मंदार टिल्लू यांनी आपले संपूर्ण आयुष्य बालरंगभूमीच्या विकासासाठी आणि बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित केले होते. पत्नी पल्लवी टिल्लू यांच्या साथीने त्यांनी ठाण्यात गंधार कला संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ बालनाट्य, नाट्य प्रशिक्षण शिबिरे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. या उपक्रमांतून अनेक मुलांना अभिनय, व्यक्तिमत्त्व विकास आणि रंगमंचावरील सादरीकरणाचे प्रशिक्षण मिळाले.
मुलांचे भावविश्व समृद्ध व्हावे, त्यांच्यातील कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे आणि त्यांना दर्जेदार मनोरंजनाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने त्यांनी अनेक बालनाट्यांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. ‘खेळण्यांची करामत’, ‘आता कसं वाटतंय’, ‘नाटू नाटू’, ‘जादूचा दिवा’ आणि ‘हिमगौरी आणि सात बुटके’ ही त्यांची काही गाजलेली बालनाट्ये होती. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटकही त्यांनी बालकलाकारांना घेऊन रंगमंचावर सादर केले होते. बालकलाकारांच्या सहभागातून डिजिटल बालनाट्य सादर करण्याचा प्रयोगही त्यांनी केला होता.
नाट्यदिग्दर्शनासोबतच त्यांनी चित्रपट क्षेत्रातही योगदान दिले. ‘मंकी बात’ या मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. नाट्य प्रशिक्षण शिबिरांच्या माध्यमातून नव्या पिढीला अभिनयाची ओळख करून देताना माधव देवचके आणि सचिन पिळगावकर यांसारख्या कलाकारांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्याचे उपक्रमही त्यांनी राबविले.
गंधार कला संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक बालकलाकार घडविण्याबरोबरच मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकारांच्या योगदानाचा गौरव करण्याची परंपराही सुरू ठेवली. त्यासाठी ‘गंधार गौरव सोहळ्या’चे आयोजन करण्यात येत असे. या सोहळ्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांचा सन्मान केला जात होता. कोकण महोत्सवासारख्या सांस्कृतिक उपक्रमांतून बोलीभाषेच्या प्रसारासाठीही ते सक्रिय होते.
रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, हा विचार प्रा. मंदार टिल्लू यांनी आपल्या कार्यातून प्रत्यक्षात उतरवला. बालकलाकारांना संधी देणे, त्यांच्यातील कलागुण ओळखून त्यांना घडविणे आणि मराठी रंगभूमीशी नव्या पिढीचे नाते जोडणे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने बालरंगभूमीच्या क्षेत्रातील एक समर्पित मार्गदर्शक हरपला असून, त्यांनी घडविलेले कलाकार आणि गंधार कला संस्थेच्या माध्यमातून उभे केलेले सांस्कृतिक कार्य हीच त्यांच्या योगदानाची कायमस्वरूपी ओळख राहणार आहे.