दीपावलीत रांगोळीतून जलसंवर्धनाचा संदेश

‘एक पणती पाणी बचतीची’ उपक्रम उत्साहात

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
वाशीम,
conservation-through-rangoli-on-diwali पाणी बचत आणि जलसंवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने श्री बाकलीवाल विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी दीपावलीनिमित्त ‘एक पणती पाणी बचतीची’ हा अभिनव उपक्रम राबविला. रांगोळीच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश देणार्‍या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये एकूण ४९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
 
 
conservation-through-rangoli-on-diwali
 
एनसीसी अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक व संदेशप्रधान रांगोळ्या साकारल्या. ‘थेंब थेंब साठवूया, पाणीटंचाई टाळूया’, ‘पाणी वाचवा, भविष्य घडवा’, ‘जल है तो कल है’ अशा घोषवायांतून पाणी बचत आणि जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमांतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धेत ऋतुजा काकडे हिने प्रथम, शुभांगी काकडे हिने द्वितीय, तर कार्तिकी मारवाडी हिने तृतीय क्रमांक मिळविला. कृष्णा भालेराव आणि देवयानी काळबांडे यांना प्रोत्साहनपर पारितोषिक जाहीर करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
 
 
दीपावलीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी कलात्मकतेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन आणि जलसंवर्धनाचा संदेश दिला. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याची बचत करणे आवश्यक असल्याची जाणीव या उपक्रमातून करून देण्यात आली. थेंब थेंब साठवूया, पाण्याचे महत्त्व जाणूया; आजची बचत, उद्याचे सुरक्षित भविष्य!’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.