नवी दिल्ली,
Mumbai bids goodbye to Hardik आयपीएल २०२७ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या मोठ्या खेळाडू अदलाबदलीमुळे हार्दिक पांड्याचा मुंबईसोबतचा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्या आता पंजाब किंग्सच्या संघातून खेळणार असल्याने मुंबई इंडियन्सने त्याला खास व्हिडिओच्या माध्यमातून भावनिक निरोप दिला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिकच्या मुंबईच्या जर्सीतील अनेक संस्मरणीय क्षणांचा समावेश असून, त्याच्या कामगिरीपासून ते विजयानंतरच्या जल्लोषापर्यंतच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत हार्दिकच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्स यांचे नाते सात हंगामांपासून जोडले गेले होते. २०१५ मध्ये संघात दाखल झाल्यानंतर त्याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर संघात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षांत मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या चारही विजेतेपदांच्या मोहिमेत हार्दिकची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. मात्र, आयपीएल २०२२ च्या हंगामापूर्वी त्याने गुजरात टायटन्सकडे मोर्चा वळवला. या संघाचे नेतृत्व करताना त्याने पहिल्याच हंगामात गुजरातला विजेतेपद मिळवून दिले, तर २०२३ मध्येही संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. त्यानंतर २०२४ मध्ये त्याचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन झाले आणि त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. आता नव्या ट्रेडमुळे त्याचा मुंबईसोबतचा दुसरा कार्यकाळही संपुष्टात आला आहे.
या अदलाबदलीमध्ये हार्दिक पांड्या १८ कोटी रुपयांच्या मोबदल्यात पंजाब किंग्समध्ये दाखल होणार असून, भारताचा आघाडीचा टी-२० आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा गोलंदाज अर्शदीप सिंग १८ कोटी रुपयांच्या किमतीत मुंबई इंडियन्सकडे येणार आहे. या बदलामुळे मुंबईच्या गोलंदाजी विभागाला नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, हार्दिकला निरोप देताना मुंबई इंडियन्सने, 'चांगल्या-वाईट अशा सर्व प्रसंगांत मुंबई इंडियन्सच्या प्रवासाचा भाग राहिल्याबद्दल धन्यवाद, हार्दिक!' असा भावनिक संदेश दिला. या संदेशातून संघाने त्याच्यासोबतच्या आठवणी आणि योगदानाची आठवण करून दिली आहे. त्यामुळे हार्दिकच्या नव्या प्रवासाबरोबरच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्येही जुन्या आठवणींची चर्चा रंगली आहे.