मुंबई
mumbai police बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मनोरंजनविश्वात खळबळ उडाली होती. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारही चिंतेत पडले होते. अनेक सेलिब्रिटींनी या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांनी अलीकडेच हरियाणातील कर्नाल येथून एका महिला आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी अनिल पंडित याची ती नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. या अटकेमुळे प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या १३ वर पोहोचली आहे. टायगरवरील हल्ल्यानंतर काही अन्य सेलिब्रिटींच्या घरांचीही टेहळणी करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने मुंबई पोलिसांनी आता बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई पोलिसांनी बॉलिवूडमधील कलाकारांसाठी विशेष सुरक्षा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, कलाकारांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून शक्यतो दूर राहावे आणि सार्वजनिक ठिकाणी चाहत्यांसोबत सेल्फी काढणे तसेच अनोळखी व्यक्तींशी जवळून संवाद साधणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. सेलिब्रिटींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यातच अलीकडेच बॉम्बे उच्च न्यायालयाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाला होता. या ई-मेलमध्ये बॉम्बे उच्च न्यायालय, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई), वरळी रेसकोर्स आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी बॉलिवूड कलाकारांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, टायगर श्रॉफवरील गोळीबाराची घटना १८ ऑक्टोबर रोजी मुंबईतील जुहू परिसरात घडली होती. अभिनेता फुटबॉलचा सामना खेळून परतत असताना त्याच्या कारवर मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी गोळीबार केला. टायगर जुहू परिसरातून आपल्या कारने बाहेर पडत असताना हल्लेखोरांनी त्याच्या वाहनाला लक्ष्य केले. या घटनेत अभिनेता सुदैवाने बचावला. गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला होता. घटनेनंतर मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तपासातील महत्त्वाची माहिती दिली होती.
तपासादरम्यान आरोपींनी टायगर श्रॉफच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या रील्स आणि व्हिडिओंचा अभ्यास केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या व्हिडिओंच्या माध्यमातून अभिनेत्याच्या हालचाली आणि त्यावेळी त्याच्यासोबत पोलीस सुरक्षा नसल्याची माहिती आरोपींना मिळाल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर त्यांनी टायगरला लक्ष्य करण्याचा कट रचला. आरोपींनी अभिनेत्याच्या बीएमडब्ल्यू कारवर एकूण सात गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात टायगर थोडक्यात बचावला असला, तरी त्याच्या उजव्या हातावर बारुदामुळे भाजल्याच्या खुणा झाल्या होत्या.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी या हल्ल्यामागील उद्देश चित्रपटसृष्टीतील लोकांमध्ये दहशत निर्माण करणे हा असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. एका अभिनेत्याच्या कारवर झालेल्या गोळीबारापासून सुरू झालेल्या या प्रकरणाचे धागेदोरे आता बॉलिवूडमधील इतर कलाकारांच्या सुरक्षेपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नव्या सूचनांमुळे चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.