नवी दिल्ली,
News regarding Gus Logie's fielding क्रिकेटच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या फलंदाज किंवा गोलंदाजाला सामनावीर पुरस्कार मिळणे ही नेहमीची बाब आहे. मात्र, ना फलंदाजी केली, ना गोलंदाजी, तरीही सामनावीराचा बहुमान मिळवला, असे म्हटले तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू गस लोगी यांनी असा अनोखा पराक्रम केला आहे. त्यांच्या नावावर क्रिकेट इतिहासातील हा विशेष विक्रम नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हा पुरस्कार एखाद्या स्थानिक किंवा क्लब स्तरावरील सामन्यात नव्हे, तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळवला होता. त्यांच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे संघाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आणि त्यांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

२८ नोव्हेंबर १९८६ रोजी शारजा क्रिकेट स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना खेळवण्यात आला होता. या लढतीत गस लोगी यांनी फलंदाजी किंवा गोलंदाजीमध्ये कोणतेही योगदान दिले नाही. मात्र, क्षेत्ररक्षणात त्यांनी कमाल केली. सलीम युसूफ, मुदस्सर नझर आणि इजाज अहमद यांचे अप्रतिम झेल टिपत त्यांनी पाकिस्तानला मोठे धक्के दिले. याशिवाय दोन फलंदाजांना धावबाद करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज जावेद मियांदाद याचाही समावेश होता. लोगी यांच्या या प्रभावी क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या १४३ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून रमीझ राजाने सर्वाधिक ४४ धावा केल्या होत्या.
पाकिस्तानने दिलेले १४४ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने अवघ्या ३३.२ षटकांत पूर्ण केले. या सामन्यात वेस्ट इंडिजने नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयात गस लोगी यांच्या क्षेत्ररक्षणाचा मोठा वाटा असल्याने त्यांना सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८० च्या दशकातील जगज्जेत्या वेस्ट इंडिज संघातील महत्त्वाचे खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती. मधल्या फळीतील फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी क्रिकेटविश्वात आपली छाप पाडली होती. पुढे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनही काम केले. फलंदाजी आणि गोलंदाजी न करताही केवळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सामन्याचा निकाल बदलता येतो, हे गस लोगी यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले. त्यामुळे त्यांचा हा विक्रम क्रिकेटविश्वातील एक आगळावेगळा प्रसंग ठरला.