वर्धा,
dialysis-centers एचएलएल या खाजगी कंपनी मार्फत, हिंदूहृदय सम्राट आपले रुग्णालय, महालॅब आणि डायलेसीस सेंटरची सेवा राज्यात सेवा पुरवल्या जात होती. वर्धा जिल्ह्यात कारंजा (घा.) आणि हिंगणघाट येथे डायलेसीस सेंटर तयार करण्यात आले होते. किडणी आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना त्याचा फायदाही होत होता. परंतु, उद्या ११ नोव्हेंबरपासुन राज्यातील सर्व डायलेसीस सेंटर बंद करण्यात येणार असल्याने किडणीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आता पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे.
महालॅब, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (आपला दवाखाना) आणि डायलेसीस सेंटर केंद्र सरकारच्या एचएलएल कंपनी मात्र १० वर्षांच्या करारावर सुरू करण्यात आल्या होत्या. या मार्फत राज्यात ४०० महालॅब, २२५ आपला दवाखाना आणि ११० डायलेसीस सेंटरच्या माध्यमातून नि:शुल्क रुग्णसेवा सुरू होती. परंतु, राज्य सरकारकडे एचएलएल कंपनीचे पैसे थकीत असल्याने त्यांनी राज्यातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. या कंपनी मार्फत वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा.) आणि हिंगणघाट येथे डायलेसीस सेंटर चालण्यात येत आहे. हिंगणघाट येथे १९ तर कारंजा येथे २५ रुग्ण सेवा घेत असताना आज अचानक ते सेंटर बंद करण्यात आल्याचे निरोप धडकले असुन उद्या ११ नोव्हेंबरपासुन डायलेसीसची सेवा बंद केली जाणार आहे. त्यामुळे कारंजा आणि हिंगणघाट येथे असलेल्या रुग्णांना पर्यायी रुग्णालय शोधावे लागणार आहे. खाजगी रुग्णालयात डायलेसीस केल्यास एका रुग्णाला जवळपास ८ ते १० हजार रुपये खर्च येतो. याशिवाय रुग्णासोबत एखादा सहकारीही असतो. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होणार असल्याची माहिती कारंजा (घा.) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास वानखेडे यांनी सांगितले.
या संदर्भात जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. पवार यांच्यासोबत संपर्क केला असता ते म्हणाले की, संबंधीत कंपनीने काम करण्याचा निर्णय घेतल्याने हे दोन्ही सेंटर बंद होणार आहेत. परंतु, आम्ही पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. कारंजा येथे वरुड, मोर्शी जि. अमरावती येथील रुग्ण येतात. हिंगणघाट येथेही आजूबाजूच्या परिसरातील ही रुग्ण येतात. दोन्ही ठिकाणच्या रुग्णांना सेवाग्राम आणि सावंगी येथे डायलेसीससाठी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील डायलेसीस सेेंटर सुरळीत सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.