राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षा जवानाच्या डोक्यात झाडली गोळी

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
diwali firecrackers
दिवाळीच्या उत्सवाला गालबोट लावणारी गंभीर घटना उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात घडली आहे. घरासमोर फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्याने राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेल्या जवानावर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ वर्षीय सौरभ तोमर यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, शस्त्रक्रियेद्वारे डोक्यातील गोळी काढण्यात आली आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन भावांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, दोघेही फरार आहेत.




मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ तोमर हे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या सुरक्षा पथकाचा भाग म्हणून कार्यरत आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी ते सुट्टीवर आपल्या उत्तर प्रदेशातील गोपालपूर खदाना या मूळ गावी आले होते. रविवारी नरकचतुर्दशीच्या दिवशी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. सौरभ हे त्यांचे भाऊ विनीत आणि मिंटू यांच्यासोबत घरासमोरील रस्त्यावर फटाके फोडत होते. त्यावेळी शेजारी राहणारे धीरज आणि त्याचा भाऊ मोनू यांनी फटाके फोडण्यास आक्षेप घेतला. यावरून त्यांची सौरभच्या भावाशी, विनीतशी बाचाबाची सुरू झाली.

सुरुवातीला शाब्दिक वाद असलेल्या या प्रकरणाचे काही वेळातच हाणामारीत रूपांतर झाले. वाद वाढल्यानंतर धीरजने गावठी पिस्तूल काढून सौरभ यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. ही गोळी आधी भिंतीला लागली आणि त्यानंतर सौरभ यांच्या डोक्याला, कानाच्या मागील बाजूस लागली. गोळी लागल्याने ते खाली कोसळले. यानंतर आरोपींच्या बाजूने विनीत यांनाही काठीने मारहाण करण्यात आली. तसेच सौरभ यांच्या कुटुंबीयांना गंभीर परिणामांची धमकी देत दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.गोळीबारानंतर कुटुंबीयांनी सौरभ यांना तातडीने बारौत येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या डोक्यात अडकलेली गोळी बाहेर काढली. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, दिवाळीच्या आनंदाच्या वातावरणात हिंसक प्रकार घडल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.सौरभ तोमर यांची २०२१ मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाली होती. सध्या ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग असलेल्या ‘प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड’मध्ये कार्यरत आहेत. भारतीय सैन्यदलातील ही सर्वांत जुनी आणि वरिष्ठ घोडदळ रेजिमेंट मानली जाते. सौरभ विवाहित असून त्यांना नऊ महिन्यांचे बाळ आहे

दरम्यान, सौरभ यांचे वडील जनकराज यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे धीरज आणि मोनू या दोघांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींचे आपल्या कुटुंबाशी पूर्वीपासून वैर असल्याचेही जनकराज यांनी तक्रारीत नमूद केले आहे. दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. फटाके फोडण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.