वाशीम,
property-worth-275-lakh-rupees-recovered रिसोड शहरासह परिसरात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रिसोड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एका संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे रिसोडसह हिंगोली आणि पुणे जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
या कारवाईत पोलिसांनी सदानंद टॉकीजजवळ राहणार्या अंकुश विश्वनाथ राऊत (वय ३०) याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडून दोन हिरो स्प्लेंडर, एक हॉरनेट, एक प्लॅटिना आणि एक शाईन अशा एकूण पाच जुन्या वापरत्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. जप्त केलेल्या या वाहनांची अंदाजे किंमत दोन लाख ऐंशी हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
तपासा दरम्यान, रिसोड पालिस ठाण्यात दाखल असलेल्या अप क्र. ९९९/२०२६ कलम ३०३(२) बीएनएस या गुन्ह्याव्यतिरिक्त गोरेगाव पोलीस ठाणे (जि. हिंगोली) येथील अप क्र. १०४/२०२६ तसेच भोसरी पोलिस ठाणे (जि. पुणे) येथील अप क्र. १२९/२०२६ या चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक मास्कर, पोलिस हवालदार गजानन झगरे, सुरज खंडके, ज्ञानदेव मात्रे, पोलिस अंमलदार अमोल इरतकर आणि चालक पोकॉ सुनील तायडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.