श्रीनगर,
Terrorists open fire in Kulgam जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) गस्ती पथकावर हल्ला केल्याची घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) दुपारी घडली. मीर बाजारमधील नौपोरा परिसरानजीक झालेल्या या हल्ल्यात तीन CRPF जवान जखमी झाले आहेत. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी दुपारी सुमारे २ वाजून १५ मिनिटांनी जवानांवर गोळीबार केला आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. जखमी जवानांना तातडीने उपचारासाठी अनंतनाग जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मीर बाजारजवळील CRPF छावणी परिसरात ही घटना घडली. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने परिसराचा ताबा घेतला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. काश्मीर खोऱ्यात वारंवार घडणाऱ्या दहशतवादी घटनांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. देशाची सुरक्षा आणि सुरक्षादलांवरील हल्ल्यांविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, मागील महिन्यात छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील अलार्मेडगु छावणीत शिल्लक स्फोटके निष्क्रिय करताना झालेल्या आयईडी स्फोटात CRPFचे चार अधिकारी जखमी झाले होते. कुलगाममधील ताज्या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.