विमानाच्या आरशावर धमकीचा संदेश; कोलकाता विमानतळावर खळबळ!

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
कोलकाता,
Threatening message on an aircraft mirror पश्चिम बंगालमधील नेताजी सुभाष चंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सकाळी सुरक्षेच्या कारणास्तव मोठी धावपळ उडाली. मुंबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अपहरणाची धमकी देणारा संदेश आढळल्याने विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. विमान उड्डाणासाठी सज्ज असताना त्यातील शौचालयाच्या आरशावर धमकीचा संदेश लिहिल्याचे समोर आले. ही बाब लक्षात येताच वैमानिकाने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (ATC) माहिती दिली. संभाव्य धोका लक्षात घेऊन विमानाचे उड्डाण रोखण्यात आले आणि सुरक्षेच्या दृष्टीने पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.
 
 
 
aircraft mirror
 
धमकीची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी विमानाला स्वतंत्र तपासणीसाठी आयसोलेशन बे येथे हलवले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांसह विमानतळावरील विशेष सुरक्षा पथकाने विमानाची झडती घेण्यास सुरुवात केली. विमानाच्या आतील सर्व भागांची बारकाईने तपासणी करून कोणतीही संशयास्पद वस्तू आहे का, याची खातरजमा केली जात आहे. संपूर्ण तपासणीदरम्यान आवश्यक ती खबरदारी घेतली जात असून, कोणताही संभाव्य धोका निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा विशेष दक्षता घेत आहेत.
 
दरम्यान, विमानाच्या शौचालयातील आरशावर धमकीचा संदेश नेमका कोणी लिहिला आणि त्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस आणि तपास यंत्रणांकडून घेतला जात आहे. यासाठी विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यादी तपासली जात असून, विमानतळ परिसरातील तसेच विमानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रणही पडताळले जात आहे. संदेश लिहिणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी विविध शक्यता तपासल्या जात आहेत. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.