एनएनटीआरच्या जंगलात आढळला वाघाचा मृतदेह

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
थाडेझरी बिटच्या राखीव वनक्षेत्रातील घटना
विजेचा धक्का लागल्याचा प्राथमिक अंदाज

गोंदिया,
tiger dead body found in forest of NNTR  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागझिरा अभयारण्याच्या कोअर क्षेत्रात एका नर वाघाचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. १० नोव्हेंबर रोजी नागझिरा वनपरिक्षेत्रातील थाडेझरी बिटातील कक्ष क्रमांक ९९ मधील राखीव वनक्षेत्रात सामूहिक गस्तीदरम्यान ही घटना उघडकीस आली. प्राथमिक तपासणीत वाघाचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना मृत वाघ दिसताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पियुषा जगताप, नागझिरा विभागाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक विपीन लांडगे, गस्ती पथकाचे महेंद्र भांगरे आणि वनपरिक्षेत्राधिकारी ए. व्ही. लांबट यांनी घटनास्थळी धाव घेतली.
 
 
 
tiger dead body found in forest of NNTR
 
 
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) प्रमाणित कार्यपद्धतीनुसार गठित समितीने घटनास्थळाची व मृत वाघाची पाहणी केली. समितीत मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार, एनटीसीए प्रतिनिधी रुपेश निंबार्ते, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे सदस्य इद्रिस अहमद आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होता. समितीच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने वाघाचे शवविच्छेदन केले. पुढील तपासणीसाठी वाघाचे व्हिसेरा नमुने संकलित करण्यात आले आहेत. प्राथमिक निरीक्षणानुसार विजेचा धक्का लागल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मृत वाघाचे सर्व अवयव सुस्थितीत आढळून आले असून शवविच्छेदनानंतर पंचांसमक्ष त्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे.