खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत ‘चलता है’ वृत्ती नको

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
मुंबई
tukaram mundhe अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिक आणि यंत्रणांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. निकृष्ट दर्जाचे पदार्थ, नियमांची कमकुवत अंमलबजावणी आणि हलगर्जीपणा याकडे ‘चालतंय ना, एवढं काय?’ या दृष्टिकोनातून पाहण्याची सवय बदलली पाहिजे, असे आवाहन त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केले आहे. त्यांच्या या पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे.



तुकाराम मुंढे हे धडाकेबाज कारवाई आणि स्पष्ट भूमिकेसाठी ओळखले जातात. सोशल मीडियावरही ते सक्रिय असतात. यावेळी त्यांनी समाजातील गुणवत्ता आणि जबाबदारी यांविषयी भाष्य केले आहे. एखादी व्यवस्था ज्या दर्जाची अपेक्षा समाजाकडून केली जाते, त्यापेक्षा फार पुढे जाऊ शकत नाही. आपण उत्तम प्रशासन, जागतिक दर्जाच्या संस्था आणि विकसित भारताचे स्वप्न पाहतो; मात्र प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात निकृष्ट गुणवत्ता, नियमांची अपुरी अंमलबजावणी आणि सामान्य दर्जा सहज स्वीकारतो. हीच मानसिकता पुढे ‘चालतंय ना, त्यात काय?’ अशा संस्कृतीत रूपांतरित होते. त्यामुळे संस्थांची कार्यपद्धती प्रभावित होते, जबाबदारीची भावना कमी होते आणि गुणवत्तेला दुय्यम स्थान मिळते, असे मुंढे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या पोस्टसोबत त्यांनी ‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये प्रसिद्ध झालेला एक लेखही शेअर केला आहे. या लेखात हॉटेल, खानावळ किंवा ढाब्यांच्या स्वयंपाकघरात किती झुरळे असणे ग्राहकांना मान्य होईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जागरूक ग्राहकाचे उत्तर या प्रश्नावर ‘एकही नाही’ असेच असेल. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्वयंपाकघरात दोन झुरळे आढळल्यानेच संबंधित हॉटेल किंवा स्वयंपाकघर बंद करण्यासाठी तेवढे कारण पुरेसे ठरत नाही, असे निरीक्षण नोंदवले होते. भारतातील परिस्थिती लक्षात घेऊन वास्तववादी दृष्टिकोन ठेवण्याची सूचनाही न्यायालयाने अधिकाऱ्यांना केली होती.

या मुद्द्यावर मुंढे यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. भारतात लागू असलेले कायदे हे भारतीय परिस्थितीचा विचार करूनच तयार करण्यात आले आहेत; ते परदेशातील परिस्थितीवर आधारित नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कायद्याच्या अंमलबजावणीवेळी ‘आपल्याकडे असंच चालतं’ किंवा ‘एवढं काय त्यात?’ अशी भूमिका घेणे योग्य नाही. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता दर्जालाच प्राधान्य दिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.

यापूर्वी झुरळे आढळल्याच्या कारणावरून मुंढे यांनी काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सविरोधात कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती. काही आस्थापनांनी त्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी पुन्हा एकदा ‘चलता है’ मानसिकतेवर प्रहार केला असून, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याचा संदेश दिला आहे.