बोरमध्ये दोन वाघीणी अन् सहा बछड्यांची भुरळ

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
वर्धा,
two-tigresses-and-six-cubs-cast-a-spell-in-bor घनदाट जंगल, हिरवीगार वनराई, पक्ष्यांचा किलबिलाट आणि अधूनमधून कानावर पडणारी वाघाची डरकाळी अशा निसर्गरम्य वातावरणात जंगल सफारीचा आनंद अनुभवायचा असेल तर बोर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. ऐन दिवाळीच्या सुटीत या जंगलात पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने वळत असून, वाघिणी आणि त्यांच्या सहा बछड्यांच्या दर्शनाने पर्यटकांचा आनंद द्विगुणित होत आहे.
 
 
two-tigresses-and-six-cubs-cast-a-spell-in-bor
 
वर्धा व नागपूर जिल्ह्यात पसरलेला आणि जैवविविधतेने समृद्ध असलेला बोर व्याघ्र प्रकल्प सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. प्रकल्पाच्या मर्यादित क्षेत्रफळाच्या तुलनेत येथे वाघांची लक्षणीय संख्या असल्याने वन्यजीवप्रेमींसाठी हे जंगल नेहमीच खास ठरले आहे. कोअर क्षेत्रातील सफारीसोबतच नुकतेच बफर क्षेत्रातही जंगल सफारीची सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटकांना जंगलाचा विस्तीर्ण परिसर अनुभवण्याची संधी मिळत आहे. यंदाच्या दिवाळी पर्यटनात ढगा आणि रहाटी गेटला विशेष पसंती मिळत आहे. ढगा गेटमधून जंगलात प्रवेश करणार्‍या पर्यटकांना बीटीआर-१६ या वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांचे दर्शन होत आहे. तर रहाटी गेटमार्गे सफारी करणार्‍या पर्यटकांना बीटीआर-७ या पिंकी नामक वाघिणीसह तिचे तीन बछडे पाहण्याचा आनंद मिळत आहे. जंगलात मुतपणे वावरणार्‍या या वाघिणी आणि त्यांच्या बछड्यांची झलक टिपण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात.
 
 
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील सफारीदरम्यान वाघासह बिबट, अस्वल व विविध वन्यप्राणी, पक्षी, वनस्पती आणि निसर्गाचे वेगवेगळे रूप पर्यटकांना अनुभवता येत आहे. दिवाळीच्या सुटीत कुटुंबीयांसह जंगल पर्यटनाचा आनंद घेणार्‍यांसाठी बोर व्याघ्र प्रकल्प एक आकर्षक पर्यटनस्थळ ठरत आहे. बफर सफारीत वाघिणींसह सहा बछड्यांच्या दर्शनाची पर्वणी आणि बफर क्षेत्रातील निसर्गवैभव यामुळे ढगा व रहाटी गेटला पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे.