दिवाळी प्रदूषणावरून योगींचा विरोधकांना टोला!

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
लखनौ,
diwali-pollution दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषण वाढल्याच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. दिवाळीच्या दिवशी लोकांनी फटाके फोडले, त्यामुळे प्रदूषण होणारच; मात्र ते काही काळाने कमी होईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही, असे विधान त्यांनी केले. यावेळी त्यांनी भ्रष्ट कारभारामुळे व्यवस्था प्रदूषित करणाऱ्यांवर टीका करत प्रदूषणाच्या मुद्द्यावरून केल्या जाणाऱ्या चर्चेवर प्रश्न उपस्थित केले.
 
yogi
 
योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेशात यंदा दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अयोध्येतील दीपोत्सव आणि फटाक्यांची आतषबाजीही भव्य स्वरूपात पार पडली. आपण स्वतः अयोध्येतील आतषबाजीला उपस्थित होतो. लोक सण साजरे करतात, तेव्हा अचानक प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जातो, असेही त्यांनी नमूद केले.
 
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील रोजगार आणि सरकारी नोकरभरतीच्या जुन्या व्यवस्थेवरही भाष्य केले. २०१७ पूर्वी राज्यात पात्रतेपेक्षा ओळख, शिफारस आणि पैशांच्या जोरावर नियुक्त्या होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावेळी तरुणांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नोकऱ्या मिळत नसल्याने अनेकांना राज्याबाहेर जावे लागत होते. सरकारी भरती आयोग आणि मंडळांवर विशिष्ट लोकांचे नियंत्रण होते. परीक्षेला एक व्यक्ती बसायची आणि नियुक्तीपत्र मात्र दुसऱ्याच व्यक्तीला मिळायचे, अशी परिस्थिती असल्याचा दावा त्यांनी केला.
 
२०१७ मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर पोलीस आणि गृह विभागाची बैठक घेतली असता उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये दीड लाख पदे रिक्त असल्याची माहिती मिळाल्याचे योगी यांनी सांगितले. याच संदर्भात त्यांनी समाजवादी पक्षाच्या तत्कालीन सरकारवर टीका केली. त्यांच्या कार्यकाळात दंगल नियंत्रणासाठी महत्त्वाच्या असलेल्या पीएसीच्या ३४ कंपन्या बरखास्त करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. समाजवादी पक्षाच्या चार सरकारांच्या काळात राज्यात सुमारे १,५०० दंगली झाल्या आणि अनेक ठिकाणी दीर्घकाळ संचारबंदी लागू होती, असे ते म्हणाले.
 
पूर्वी धनत्रयोदशी, होळी, दिवाळी, विजयादशमी, जन्माष्टमी, शिवरात्री, ईद, ख्रिसमस आणि गुरुपर्व अशा सणांच्या आधी राज्यात दंगली घडत असल्याचा दावा योगी यांनी केला. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण होते. संचारबंदीमुळे बाजारपेठा बंद राहत आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असे. मात्र, गेल्या साडेनऊ वर्षांत राज्यात दंगली किंवा संचारबंदीची परिस्थिती निर्माण झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
 
यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. येत्या २६ जानेवारीपर्यंत तरुणांना आणखी एक लाख नियुक्तीपत्रे देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या घोषणेवर अखिलेश यादव यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना योगी यांनी त्यांच्या उशिरा उठण्याच्या सवयीवरून उपरोधिक टिप्पणी केली. सरकार नियुक्तीपत्रांचे वाटप करत असताना विरोधकांना त्याची माहितीही नसते, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले.
 
शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जमिनींच्या मोजणीसाठी आधुनिक रोव्हर तंत्रज्ञानाचा वापर सुरू केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. पूर्वी साखळी आणि दोरीच्या साहाय्याने जमिनींची मोजणी केली जात होती. त्यामध्ये चुका होऊन गरीब नागरिकांचे नुकसान होत असे. आता उपग्रहाधारित तंत्रज्ञानामुळे अधिक अचूक मोजणी शक्य झाली असून नागरिकांना त्यांच्या जमिनीवरील हक्क मिळवून देण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
केवळ जून महिन्यात सुमारे ७० हजार मोजणीची कामे पूर्ण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये रोव्हर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या असून, एकाच वेळी कामे पूर्ण करण्यासाठी सरकारने वेगाने पावले उचलली आहेत. याच उपक्रमांतर्गत ४४५ रोव्हर मशीन खरेदी करण्यात आल्याची माहितीही योगी आदित्यनाथ यांनी दिली.
 
यापूर्वी अयोध्येत 'जय श्री राम' म्हणण्यावर बंदी होती आणि रामभक्तांवर गोळीबार करण्यात आला होता, असे विधानही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. या मुद्द्याचा उल्लेख करत त्यांनी पूर्वीच्या सरकारच्या कारभारावर पुन्हा टीका केली.