दार उघडताच मृत्यूचा घाला! घरात घुसून तरुणाची हत्या

    दिनांक :11-Nov-2026
Total Views |
पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथील बिहटा परिसरात घरात घुसून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (१० नोव्हेंबर २०२६) रात्री उशिरा दोन दुचाकीस्वार हल्लेखोर सिमरी गावात पोहोचले. त्यांनी इरफान इमाम याच्या घराचा दरवाजा ठोठावून त्याला बाहेर बोलावले. इरफानने दरवाजा उघडताच हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मृताची ओळख ३२ वर्षीय इरफान इमाम उर्फ कल्लू ड्रायव्हर अशी झाली आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
 
Youth murdered after intruders enter his home
 
मिळालेल्या माहितीनुसार, इरफान गेल्या दोन वर्षांपासून सिमरी गावात भाड्याच्या घरात वास्तव्यास होता. मंगळवारी रात्री सुमारे ११.३० वाजता दोन अज्ञात व्यक्ती त्याच्या घरी आल्या. दरवाजा उघडताच त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेच्या वेळी इरफानचा मोठा मुलगा त्याच्यासोबत खोलीत झोपला होता. त्याची पत्नी नेहा परवीन आणि लहान मुलगा मात्र घरी नव्हते. नेहा या सिमरी गावातच असलेल्या माहेरी गेल्या होत्या. इरफान आणि नेहा यांचा विवाह सुमारे १० वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. कौटुंबिक वादामुळे इरफान पत्नी आणि मुलांसह भाड्याच्या घरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. नेहा परवीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वीही त्यांच्या पतीवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी त्या इरफानसोबत दुचाकीने आरा येथून परतत असताना बिहटा येथील मौदही गावाजवळ अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला होता. मात्र, या घटनेत दोघेही बचावले होते. आता इरफानची हत्या झाल्यानंतर त्या जुन्या घटनेचाही तपासाच्या दृष्टीने विचार केला जात आहे.
 
बिहटा पोलीस ठाण्याचे प्रभारी अमित कुमार यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री सुमारे ११.३० वाजता सिमरी गावात तरुणाची हत्या झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान घटनास्थळावरून एक रिकामी काडतूस जप्त करण्यात आली आहे. हल्लेखोर इरफानचा मोबाईल फोनही सोबत घेऊन गेल्याची माहिती आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी करत असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.