हिंगणघाट,
daga-mill-site-to-a-builder येथील १३० वर्षे आधीपासूनची केंद्र सरकारच्या वस्रोद्योग मंत्रालयद्वारा संचालित आरबीबीए मिल्सचे उत्पादन २० वर्षापासून ठप्प आहे. उत्पादन बंद झाले असले तरी गिरणी ही कायद्याने सुरूच आहे. गिरणीची जवळपास २० एकर पेक्षा जास्त जागा असून शहराच्या हृदयस्थळ असलेल्या जागेवर मागील असंख्य पिढ्या ह्या गिरणीच्या भरोशावर पोसल्या गेल्या आहेत. परंतु, मागील १२ वर्षा पासून शासकीय उपक्रम खासगी आस्थापना यांना विकून ते मोठ्या उद्योगपतीना विकण्याच्या सपाटा सुरू असल्यामुळे ही गिरणी अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्यामुळे या मोक्याच्या जागेवर काही बिल्डरचे लक्ष गेले असुन ती जागा बिल्डरच्या घशात टाकण्याचा डाव असल्याचे दबक्या आवाजात ऐकायला मिळते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ती जागा ही केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून विकत घेण्यासाठी काही मंडळी मागे लागल्याचे विश्वसनीय रित्या कळते. वास्तविक केंद्र सरकारच्या नियमानुसार, जो उद्योग बंद पडल्या नंतर दुसर्या कोणी विकत घेतला तर नियमानुसार त्या विकत घेणार्या व्यक्तीला त्या ठिकाणी उद्योगचं स्थापन करावा लागतो. परंतु, या गोष्टीला हरताळ फासून ह्या जागेवर निवासी किंवा व्यापारी संकुल उभारण्यात येतं असल्याचे कळते. येथील १३५ वर्षे जुन्या मोहता गिरणी ची जागाही अशीच एका उद्योगपतीने विकत घेऊन त्या ठिकाणी निवासी संकुल उभारण्यात येतं आहे. परंतु सरकारचे याकडे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून येतं आहे. सदर जुनी मिल ही तत्काळ पूर्ववत केंद्र सरकारने सुरू करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. परंतु, ती जागा ही विकू नये अशी जनतेची मागणी आहे.
शासन चरणी नम्र विनंती : वांदिले
आजही येथील जुनी मिल ही सुरू होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या गिरणीवर आजवर अनेकांचे जीवन घडले आहे. ही गिरणी पुनः चालू करून येथील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी माझी शासन चरणी नम्र विनंती आहे अशी प्रतिक्रिया राकाँ शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल वांदिले यांनी या गिरणी संदर्भात व्यक्त केली.