अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन विवाहबंधनात; ग्रीसमध्ये पार पडला शाही सोहळा

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
मुंबई,
anirudh-ravichander प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि इंडियन प्रीमियर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघाची सहमालक काव्या मारन अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्याची आणि लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी या दोघांनी ग्रीसमध्ये अत्यंत खासगी आणि दिमाखदार पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर रात्री उशिरा अनिरुद्धने स्वतः सोशल मीडियावर विवाहसोहळ्यातील खास छायाचित्रे शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
 
anirudh-ravichander
 
अनिरुद्धने छायाचित्रांसोबत, “माझ्या आयुष्यातील एकमेव आणि आयुष्यभरासाठीचा क्षण… ११.११,” असे भावनिक कॅप्शन लिहिले आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून आणि चाहत्यांसह मनोरंजन क्षेत्रातील अनेकांकडून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या विवाहसोहळ्यासाठी ग्रीसमधील खास ठिकाणाची निवड करण्यात आली होती. कुटुंबातील सदस्य आणि मोजके निमंत्रित पाहुणे अशा मर्यादित उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या आनंदाच्या प्रसंगी सुपरस्टार रजनीकांत, त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यासह काही निवडक मान्यवर उपस्थित होते. रजनीकांत आणि स्टॅलिन कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे या विवाहसोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
  
काव्या मारन या प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन यांच्या कन्या आहेत. सन टीव्ही नेटवर्कच्या कार्यकारी संचालिका असण्याबरोबरच त्या क्रीडा क्षेत्रातही परिचित आहेत. आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाच्या सहमालक म्हणून त्या अनेकदा चर्चेत असतात. दुसरीकडे, अनिरुद्ध रविचंदरने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह हिंदी चित्रपटांसाठीही संगीत दिले आहे. त्याच्या संगीताला मोठा चाहतावर्ग असून, अल्पावधीतच त्याने संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 
काव्या आणि अनिरुद्ध यांच्या नात्याबाबत गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू होती. मात्र, दोघांनीही आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत गुप्तता राखली होती. अखेर मंगळवारी, १० नोव्हेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने त्यांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे ११ नोव्हेंबरला त्यांनी विवाहगाठ बांधली. खासगी स्वरूपात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याची छायाचित्रे समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.