ताडोबाच्या जंगलात दुर्मिळ पक्ष्याचे आगमन

जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला लाल पंखाचा चातक

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
चंद्रपूर,
arrival-of-a-rare-bird-in-the-tadoba-forest ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात एका दुर्मिळ अशा लाल पंखाचा चातक आढळून आला आहे. या स्थलांतरित पक्ष्याची ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच अधिकृत नोंद झाली आहे. 7 नोव्हेंबर 2026 रोजी कोळसा वनपरिक्षेत्रात या दुर्मिळ पक्ष्याचे दर्शन घडले. कारवाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद जांभुळे यांनी, या पक्ष्याचे निरीक्षण करून छायाचित्रासह त्याची नोंद केली. विशेष म्हणजे, ही नोंद ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी पहिली अधिकृत व छायाचित्राद्वारे पुष्टी झालेली नोंद ठरली आहे.
 
 
arrival-of-a-rare-bird-in-the-tadoba-forest
 
लाल पंखाचा चातक हा कोकिळ कुळातील मध्यम आकाराचा आकर्षक पक्षी आहे. डोक्यावर चमकदार काळ्या रंगाचा तुरा, मानेभोवती पांढरा पट्टा आणि तांबूस-तपकिरी रंगाचे आकर्षक पंख ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हा स्थलांतरित पक्षी असून त्याचा प्रजनन काळ प्रामुख्याने हिमालयाच्या पायथ्याशी आणि ईशान्य भारतातील काही भागांत असतो. स्थलांतराच्या काळात तो द्वीपकल्पीय भारतातही आढळतो.
 
 
महाराष्ट्रात या पक्ष्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते. पक्ष्यांच्या निरीक्षणांची जागतिक स्तरावर नोंद ठेवणार्‍या संकेतस्थळानुसार, महाराष्ट्रात या पक्ष्याच्या केवळ सात नोंदी उपलब्ध आहेत. त्यामुळे ताडोबातील ही नोंद राज्याच्या पक्षीवैविध्याच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची ठरली आहे. वन्यजीव अभ्यासक तथा कोठारी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी रुंदन कातकर यांनी सांगितले की, मागील वर्षीही याच परिसरात या पक्ष्याचे दर्शन झाले होते. मात्र, त्यावेळी छायाचित्र घेता न आल्याने अधिकृत नोंद करता आली नव्हती. यंदा छायाचित्रासह झालेल्या नोंदीमुळे या दुर्मिळ पक्ष्याच्या अस्तित्वाला अधिकृत पुष्टी मिळाली आहे. या नव्या नोंदीमुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नोंदणीकृत पक्षी प्रजातींची संख्या आता 304 झाली आहे.
 
 
वन विभागाकडून परिसरातील पक्ष्यांचे नियमित निरीक्षण आणि दस्तऐवजीकरण सुरू आहे. पर्यटक, पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींनी अशा दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन झाल्यास त्याची योग्य पद्धतीने नोंद करावी. तसेच छायाचित्रण करताना पक्ष्यांना किंवा त्यांच्या अधिवासाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.