मुजफ्फरपूर
bihar fake currency बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यात बनावट भारतीय चलनी नोटांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साहेबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुस्सेपुर जोडा कन्हाई गावात छापा टाकून पोलिसांनी वीरेंद्र सहनी या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या २८ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, त्यांचे एकूण मूल्य १४ हजार रुपये आहे. या कारवाईमुळे परिसरातील बनावट नोटांच्या व्यवहाराचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक कांतेश कुमार मिश्रा यांच्या निर्देशानुसार सरैया उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत कौर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. साहेबगंज पोलीस पथकाला संबंधित परिसरात बनावट नोटांचा व्यवहार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक तयार करून संशयित वीरेंद्र सहनी याच्या घराला घेराव घातला आणि झडती घेतली. त्यावेळी घरात लपवून ठेवलेल्या ५०० रुपयांच्या २८ बनावट नोटा आढळून आल्या.
या प्रकरणाची माहिती देताना ग्रामीण पोलीस अधीक्षक राजेश सिंह प्रभाकर यांनी सांगितले की, एक व्यक्ती बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आणत असून, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अशा नोटा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी आणि साहेबगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने ही कारवाई केली.
पोलिसांच्या चौकशीत वीरेंद्र सहनी याने अन्य साथीदारांच्या मदतीने बनावट भारतीय चलनी नोटांच्या अवैध वितरण आणि व्यवहारात सहभागी असल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. त्याला एका वाहकाच्या माध्यमातून एकूण २० हजार रुपयांच्या बनावट नोटा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी सहा हजार रुपयांच्या नोटा त्याने बाजारात चलनात आणल्या, तर उर्वरित १४ हजार रुपयांच्या नोटा त्याच्याकडे शिल्लक होत्या. पोलिसांनी याच नोटा जप्त केल्या आहेत.
या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे वीरेंद्र सहनी हा बनावट नोटांचा पुरवठा करणाऱ्या संघटित टोळीशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या टोळीचे धागेदोरे नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या अवैध व्यवहारामागील संपूर्ण नेटवर्क शोधण्याचे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या इतर साथीदारांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, या टोळीतील आणखी किती जण सहभागी आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणी साहेबगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९५७/२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. बनावट नोटा जप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर अन्य तपास यंत्रणांनाही याबाबत माहिती देण्यात येत असल्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. या कारवाईनंतर बनावट चलनी नोटांच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.