वर्धा,
bor sanctuary घनदाट जंगल, उंच वृक्ष, पक्ष्यांचा किलबिलाट आणि अचानक समोर येणारा पट्टेदार वाघ... अशा रोमांचकारी वातावरणाचा अनुभव सध्या बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राची जंगल सफारी करताना पर्यटकांना येत आहे. वाघाचे प्रत्यक्ष दर्शन घडत असल्याने बोरच्या जंगल सफारीकडे पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने वळत आहे. विशेष म्हणजे, यंदा अल्प पर्जन्यमानामुळे बफर आणि प्रादेशिक क्षेत्रातील निम्म्याहून अधिक नैसर्गिक पाणवठे आटले आहे. परिणामी, पाण्याच्या उपलब्धतेच्या शोधात काही वाघांनी बोरच्या कोअर क्षेत्रात आश्रय घेतल्याचे वन्यजीव विभागाच्या सूक्ष्म निरीक्षणातून समोर आले आहे.
क्षेत्रफळाच्या तुलनेत बोर व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या अधिक आहे. बोरची राणी अशी ओळख असलेली बीटीआर-३ कॅटरिना वाघीण आणि तिचा बछडा ओम हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. त्याचबरोबर बीटीआर-१७ हा राजबिंडा नर वाघही आपल्या भारदस्त रूपाने पर्यटकांना भुरळ घालत आहे. विशेष आकर्षण म्हणजे, दोन बछड्यांसह बोरच्या कोअर क्षेत्रात पाहुणचारासाठी आलेली वाघीण सध्या पर्यटकांना दर्शन देत आहे. त्यामुळे सफारीदरम्यान वाघांच्या विविध हालचाली टिपण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे. प्रवेशद्वारावरून जंगलात जिप्सी प्रवेश करताच पर्यटकांच्या मनात व्याघ्र दर्शनाची उत्सुकता शिगेला पोहोचते. जंगलातील कच्च्या वळण रस्त्यांवरून धावणार्या सफारी वाहनांचा आवाज, झाडाझुडपांतून दिसणार्या वन्यप्राण्यांच्या हालचाली, पक्ष्यांचे आवाज आणि अचानक एखाद्या झुडपातून बाहेर पडणारा वाघ, बिबट हा प्रत्येक क्षण पर्यटकांसाठी रोमांचकारी ठरत आहे.
पाणवठ्यांत पाण्याची उपलब्धता घटली
अल्प पावसामुळे बफर आणि प्रादेशिक क्षेत्रातील नैसर्गिक पाणवठ्यांवर पाण्याची उपलब्धता घटली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींमध्येही बदल जाणवत आहे. कोअर क्षेत्रात पाण्याची उपलब्धता आणि अनुकूल अधिवासामुळे काही वाघांनी या भागात मुक्काम ठोकल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांनी केलेल्या निरीक्षणात पुढे आले आहे.bor sanctuary बीटीआर-१७ हा नर वाघ ऐरवी बोर प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात राहतो. पण, सध्या तो बोर व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात मुक्काम ठोकून असल्याचे सांगितले जात आहे.
कोअर सफारीची ऑनलाइन बुकींग ‘फुल्ल’
दिवाळी, नाताळ आणि इंग्रजी नववर्षाच्या सुट्यांचे औचित्य साधून अनेक पर्यटकांनी बोर सफारीचे नियोजन केले आहे. परिणामी, कोअर क्षेत्रातील जंगल सफारीचे ऑनलाइन बुकिंग फुल्ल होत असून, अनेकांना प्रतीक्षा यादीचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.