अनिल कांबळे
नागपूर,
sexual abuse सावत्र पित्यानेच ११ वर्षीय मुलीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार पाचपावली परिसरात उघडकीस आला आहे. पतीच्या वर्तनावर संशय आल्याने मुलीच्या आईने घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. त्यातील चित्रणातून मुलीवरील कथित अत्याचाराचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी ४५ वर्षीय सावत्र पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ऑगस्ट ते ९ नोव्हेंबर या कालावधीत स्वतःच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पतीच्या वर्तनाबाबत संशय निर्माण झाल्याने मुलीच्या आईने भाड्याच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मुलीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या कॅमेऱ्यांचे थेट चित्रण तिच्या एका मैत्रिणीच्या मोबाईलवरही पाहता येत होते. सीसीटीव्हीतील चित्रण तपासताना मैत्रिणीला संशयास्पद प्रकार दिसला. तिने संबंधित चित्रण जतन करून मुलीच्या आईला दाखविले. हे दृश्य पाहून हादरलेल्या आईने मुलीकडे विचारणा केली. त्यावेळी मुलीने वडील वारंवार तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार करीत असल्याचे सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
जीवे मारण्याची धमकी
मुलीने आईला दिलेल्या माहितीनुसार, अत्याचाराची बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे ती बराच काळ भीतीत वावरत होती, असे तक्रारीत नमूद आहे. मुलीकडून हा प्रकार समजल्यानंतर आईने पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.sexual abuse पाचपावली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील (बीएनएस) संबंधित तरतुदींसह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम ६, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.