अनिल कांबळे
नागपूर,
couples death mystery बेसा परिसरातील रेवतीनगर येथे शिक्षक दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ अधिकच गडद झाले आहे. मनीष प्रल्हाद गणवीर (३८) आणि त्यांची पत्नी सोनाली (३५) यांचे मृतदेह दिवाळीच्या सकाळी घरात एकाच पंख्याला वेगवेगळ्या ओढण्यांच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते. घटनास्थळी दारूच्या दोन बाटल्या, ग्लास आणि शीतपेयाची बाटली आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय मृतदेहांवर असलेल्या किरकोळ खरचटण्याच्या खुणाही पोलिसांच्या तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.
मात्र, पती-पत्नीच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही गुलदस्त्यातच आहे.बेलतरोडीचे ठाणेदार रवींद्र नाईकवाड यांच्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी दुपारच्या सुमारास दाम्पत्यामध्ये वाद झाला होता. या वादानंतर त्यांनी कोणालाही घरी बोलावून आपली व्यथा सांगितली नव्हती. वेळीच कोणाशी संवाद साधला असता, तर कदाचित ही घटना टाळता आली असती, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना दारूच्या दोन बाटल्या, ग्लास आणि शीतपेयाची बाटली आढळली. या वस्तूंचा वापर कुणी केला होता? आणि त्यांचा दाम्पत्याच्या मृत्यूशी काही संबंध आहे का?, याचा तपास सुरू आहे. मृतांच्या शरीरावरील किरकोळ खरचटण्याच्या खुणांबाबतही पोलिस माहिती गोळा करीत आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार, आधी मनीष यांनी गळफास घेतला असावा आणि त्यानंतर सोनाली यांनीही आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.couples death mystery मात्र, हा केवळ प्राथमिक अंदाज असून, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस सर्व संभाव्य बाबी तपासत असून, घटनाक्रमाची उकल करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.