गुन्हेगाराची दहशत; जिवे मारण्याची धमकी देत केला वार

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |

अनिल कांबळे

नागपूर,

jaripatka crime लक्ष्मीपूजनानंतर घरासमोर फटाके फोडत असलेल्या व्यक्तीशी परिसरातील एका गुंडाने वाद घातला. शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर लगेच चाकूने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी जखमी अश्वजित कैलास सहारे (३५, रा. गौतमनगर)च्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. अक्षय भैसारे असे आरोपीचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
 

jaripatka crime 
 
 

मिळालेल्या माहितीनुसार, अश्वजित हा कॅटरिंगचा व्यवसाय करतो. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर तो मित्र सुनील नानोटकर याच्यासोबत घरासमोर फटाके फोडत होता. यावेळी परिसरातच राहणारा अक्षय भैसारे हा तेथे आला. तो बराच वेळपासून अश्वजितकडे रागाने पाहत होता. त्यामुळे त्याने अक्षयला हटकत, एकटक पाहण्याचे कारण विचारले. यामुळे आरोपी चिडला. त्याने गुंड असल्याचे सांगत, 'मला ओळखत नाही का? आताच तुझा गेम करतो,' अशी धमकी देत शिवीगाळ सुरू केली. अश्वजितने शिवीगाळ करण्यास विरोध केला असता अक्षयने चाकू काढला आणि त्याच्या गुप्तांगावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अश्वजितने बचावासाठी अंग वळविल्याने चाकूचा वार त्याच्या कंबरेवर बसला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.jaripatka crime मित्र आणि नातेवाईकांनी अश्वजितला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. त्याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अक्षय भैसारे याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.


ठाणेदारावर कारवाईची टांगती तलवार ?

बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अक्षय मडावी याने रस्त्यावर फटाके फोडण्याच्या वादातून चाकूने वार करीत बॉबी सपाटे या निष्पाप युवकाचा खून केला. या प्रकरणात ठाणेदार चेतन चव्हाण यांची तडकाफडकी कंट्रोल रुमला बदली करण्यात आली. अशाच प्रकारची घटना जरीपटका हद्दीत घडली आहे. त्यामुळे या प्रकरणातसुद्धा ठाणेदारावर कारवाईची टांगती तलवार आहे.