एकरातील पीक जळून खाक: दोषींना शोधून नुकसानभरपाईची मागणी

    दिनांक :12-Nov-2026
Total Views |
गोंदिया, 
crops-on-an-acre-of-land-burnt-to-ashes गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या कन्हारटोला येथे अज्ञात व्यक्तीने शेतात मळणीसाठी ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याला (ढिगाला) आग लावल्याची धक्कादायक घटना बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. या आगीत शेतकरी हिरदिलाल बिसेन यांच्या एक एकरातील धानाचे संपूर्ण पीक जळून खाक झाले. या घटनेमुळे शेतकर्‍याचे वर्षभराचे कष्ट आणि अपेक्षित उत्पन्न आगीत भस्मसात झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
 
 
crops-on-an-acre-of-land-burnt-to-ashes
 
सध्या धान कापणीचा हंगाम सुरू असून शेतकरी कापणी केलेल्या धानाची मळणी करण्यासाठी शेतात पंुजणे तयार करून ठेवत आहेत. त्यानंतर मळणी करून आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विक्रीसाठी नेले जाते. याच पद्धतीने हिरदिलाल बिसेन यांनी आपल्या एक एकर शेतातील धान कापून मळणीसाठी ढीग लावून ठेवला होता. मात्र, अज्ञात व्यक्तीने या धानाच्या ढिगाला आग लावली. धान वाळलेले असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण धान पुंजणे जळून राख झाले. आगीत संपूर्ण पीक नष्ट झाल्याने बिसेन यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत असताना अशा प्रकारच्या आगीच्या घटनांमुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडत आहे. या घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकर्‍याला तातडीने आर्थिक मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.