नवी दिल्ली
sewer दिल्लीतील नांगलोई विहार परिसरातील दास गार्डन कॉलनीमध्ये उघड्या सीवरमध्ये पडून चार वर्षांचा चिमुकला बेपत्ता झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), दिल्ली अग्निशमन दल, दिल्ली पोलीस आणि दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (DDMA) पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही मुलाचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला असून त्यांची चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमरान असे या चार वर्षांच्या मुलाचे नाव आहे. तो आईसोबत परिसरातील उद्यानात खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना तो शौचासाठी सीवरजवळ गेला. त्याठिकाणी मॅनहोलचे झाकण उघडे असल्याने त्याचा तोल जाऊन तो थेट गटारात पडला. मात्र, मुलगा नेमका शौचासाठी गेला असताना पडला की खेळताना अचानक घसरून मॅनहोलमध्ये कोसळला, याबाबत घटनास्थळावरील माहितीमध्ये दोन वेगवेगळे तपशील समोर आले आहेत.
दिल्ली अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी या घटनेबाबत आपत्कालीन कॉल प्राप्त झाला. त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले. चार वर्षांचा मुलगा आईसोबत उद्यानात असताना उघड्या मॅनहोलमधून सीवरमध्ये पडल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले; मात्र सुरुवातीच्या प्रयत्नांत मुलाचा शोध लागला नव्हता.
इमरानचे वडील खुर्शीद आलम यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा उद्यानात खेळण्यासाठी आला होता. त्यानंतर तो शौचासाठी सीवरजवळ गेला. सीवर उघडे असल्याने तो त्यामध्ये पडला. सध्या बचाव पथकांकडून त्याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाच्या बेपत्ता होण्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्याचे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) रजत मल्होत्रा यांनी स्पष्ट केले. NDRFच्या पथकासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले असून मुलाला शोधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील माहिती उपलब्ध होताच ती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विशेष बचाव पथक सीवरच्या आत उतरून शोधमोहीम राबवत आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी सक्शन पंप आणि स्कॅनिंग उपकरणांचा वापर केला जात आहे. सीवरमधील परिस्थिती लक्षात घेऊन पथकांकडून काळजीपूर्वक शोध घेतला जात असून बचावकार्य अद्याप सुरू आहे.दरम्यान, यापूर्वी १७ जून २०२६ रोजी गुरुग्राममध्ये द्वारका एक्स्प्रेसवेच्या जवळ सीवर लाइनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार कोसळून अपघात झाला होता. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला होता. उघडे मॅनहोल आणि सीवरच्या कामासाठी खोदलेले खड्डे यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.