डिंडोरी,
dindori-explosive-sweet-incidentएखाद्या व्यक्तीला रसगुल्ला खाण्यासाठी देण्याच्या बहाण्याने चक्क स्फोटक दिल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यात घडली आहे. गावातील एका व्यक्तीने ३५ वर्षीय तरुणाला सुअरमार बॉम्ब (रानडुकरांना मारण्यासाठी वापरले जाणारे स्फोटक) रसगुल्ला असल्याचे सांगून खाण्यास दिल्याचा आरोप आहे. तरुणाने मिठाई समजून तो तोंडात टाकला आणि दाताने चावताच जोरदार स्फोट झाला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मृत तरुणाचे नाव राजेंद्र बरौतिया (वय ३५) असे आहे. डिंडोरी जिल्ह्यातील पडरिया छांटा गावात तो कुटुंबीयांसोबत राहत होता. मंगळवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी सुमारे सात वाजता कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर तो घराच्या अंगणात शेकोटीजवळ बसला होता.
दरम्यान, रात्री आठच्या सुमारास गावातील रामभगत बरौतिया तेथे आला. तो राजेंद्रच्या शेजारी बसला आणि दोघांमध्ये नेहमीप्रमाणे बातचीत सुरू झाली. याच संभाषणादरम्यान रामभगतने कथितरीत्या राजेंद्रला सुअरमार बॉम्ब दिला. हा बॉम्ब रसगुल्ला असल्याचे सांगितल्याने राजेंद्रने त्यावर विश्वास ठेवला.राजेंद्रने रसगुल्ला समजून ती वस्तू तोंडात टाकली. मात्र, दाताने चावताच त्याचा तोंडातच स्फोट झाला. या स्फोटामुळे त्याच्या तोंडाला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या धमाक्यामुळे कुटुंबीय घाबरले. त्यांनी तातडीने राजेंद्रला ऑटोमधून डिंडोरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले; मात्र गंभीर दुखापतीमुळे त्याला वाचवता आले नाही. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बुधवारी पोलिसांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.या घटनेची माहिती मिळताच डिंडोरी कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक दुर्गा प्रसाद नागपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रामभगत बरौतिया याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ तसेच स्फोटक पदार्थ अधिनियमाच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय न्याय संहितेचे कलम १०५ हे सदोष मनुष्यवधाशी संबंधित आहे. पोलिसांकडून आरोपीची भूमिका आणि घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे.
या घटनेनंतर पडरिया छांटा गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका सामान्य गप्पांदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांनाही धक्का बसला आहे. रामभगत बरौतिया याच्याकडे हा स्फोटक पदार्थ कुठून आला, त्याने तो राजेंद्रला खाण्यासाठी देण्यामागे नेमका काय उद्देश होता आणि या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.