वर्धा,
old-age-home सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत कृष्णगिरी परिवाराचे प्रमुख महेश गुल्हाने यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त सिंदी (मेघे) येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आई-बाबांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना कपडे, भेटवस्तूंचे वाटप करत भोजन देण्यात आले तर समृद्धी महामार्गावरील अपघातात प्राण गमावलेल्या व जखमी झालेल्या वर्ध्यातील भाविकांच्या कुटुंबीयांंना भेटवस्तू व आर्थिक मदतीचा आधार देण्यात आला. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, शप गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, कृष्णगिरी परिवाराचे प्रमुख ज्येष्ठ समाजसेवक महेश गुल्हाणे, आदी उपस्थित होते.

कृष्णगिरी परिवाराच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात २५ वर्षांपासून दिवाळी साजरी करण्याची परंपरा जपली जात आहे. त्यांच्याही आयुष्यात दिवाळीचा आनंद फुलावा, या भावनेतून हा उपक्रम राबविला जातो. यासोबतच समृद्धी महामार्गावरील अपघातात वर्धा शहरातील सोमनाथे लेआउट येथील मातृशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळाच्या भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेमुळे अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटवस्तू आणि आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी ना. डॉ. भोयर म्हणाले, महेश गुल्हाने आणि मित्रपरिवाराच्या वतीने २५ वर्षांपासून मातोश्री वृद्धाश्रमात दिवाळीच्या निमित्ताने सेवा करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. आज दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत समाजातील गोरगरीब आणि गरजवंतांना मदत करण्यासाठी समाजातील चांगल्या घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे डॉ. भोयर म्हणाले.
तर महेश गुल्हाणे यांनी आम्ही कृष्णगिरी परिवाराच्या माध्यमातून आमच्या परीने फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून वृद्धामाला मदत करतो. मात्र समाजातील प्रत्येकाने एकत्र येऊन आपल्या क्षमतेनुसार गरजू कुटुंबांना मदत केली पाहिजे. वृद्धाश्रमाला केवळ दिवाळीच्या दिवशी भेट देऊन चालणार नाही तर त्यांना जेव्हा मदतीची गरज असेल, तेव्हा समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आम्ही दरवर्षी दिवाळीच्या आदल्या दिवशी चार ते पाच तास आई-बाबांसोबत घालवतो. त्यांना आर्थिक मदतीसोबतच प्रेम, आपुलकी आणि मायेच्या सहवासाचीही गरज असल्याचे महेश गुल्हाने म्हणाले. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष पुष्पमाला देशमुख, सचिव रेखा देशपांडे, स्नेहा आकरे, अजय वझुरकर, प्रवीण जैन, अनिल गुल्हाने, प्रमोद श्रीराव, आश्विनी गुल्हाणे, अंश गुल्हाने, किशोर सुरकार, आदी उपस्थित होते.