वर्धा,
guardian-minister दत्ता मेघे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजनेंतर्गत जिल्हास्तरीय पांदन रस्त्याच्या कामांचे भुमिपूजन पवनार येथील मामा-भाचा समाधीजवळ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते आज ११ रोजी करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार सागर मेघे, स्मिता मेघे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी अध्यक्ष सुनील गफाट, मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते समितीचे सहअध्यक्ष अशोक कलोडे, अजय गांडोळे आदी उपस्थित होते.
शेतकर्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध व्हावे, शेतीची मशागत सुलभ व्हावी तसेच शेतमालाची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना करता यावी, यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. या रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेती व्यवस्थेला बळकटी मिळणार असून शेतकर्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केले.
शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असून शेतकर्यांना शेतीच्या कामांसाठी वर्षभर शेतापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना शेतापर्यंत बारमाही रस्ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या रस्त्यांमुळे ट्रॅक्टर, कृषी यंत्रसामग्री तसेच इतर वाहनांची शेतापर्यंत ये-जा सुलभ होईल. पेरणी, नांगरणी, कापणी यांसारख्या शेतीच्या विविध कामांसाठी लागणारी साधने वेळेत शेतापर्यंत पोहोचविता येतील. तसेच कापणीनंतर शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी होणारा त्रास कमी होऊन वाहतुकीचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होईल, असे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले.
पांदन रस्ते हे केवळ शेतापर्यंत पोहोचण्याचे साधन नसून ग्रामीण भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आहेत. या रस्त्यांच्या विकासामुळे शेतीची उत्पादकता वाढविण्यास, कृषी क्षेत्रातील आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुलभ करण्यास आणि शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुरवातीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विनोद बोकडे यांच्या शेताजवळ कुदळ मारून पाणंद रस्त्याचे भूमिपूजन केले.
जिल्ह्यात होणार ६७३ पांदन रस्ते
जिल्ह्यात ६७३ पांदन रस्ते करण्यात येणार आहे. त्यात आर्वी विधानसभा मतदारसंघात ११२, देवळी मतदारसंघात १६२, हिंगणघाट मतदारसंघात १९८ तर वर्धा विधानसभा मतदारसंघात २०१ कामांचा समावेश आहे. या कामांवर २७ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.