अमरावती,
sipna wildlife range of melghat जैवविविधतेने समृद्ध असलेल्या मेळघाटच्या वनवैभवात आणखी एका दुर्मिळ पक्ष्याची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सीपना वन्यजीव क्षेत्रातील सेमाडोह परिसरात स्पॉट-बेलीड ईगल आउल (Spot-bellied Eagle-Owl) अर्थात ठिपकेदार पोटाचे घुबड या दुर्मिळ घुबड पक्ष्याची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. ही नोंद मेळघाट वन्यजीव क्षेत्रासाठी विशेष महत्त्वपूर्ण असून मध्य भारतातील या प्रजातीची ही दुसरी नोंद ठरली आहे.
यापूर्वी मध्य भारतात या घुबडाची सर्वप्रथम नोंद महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरात झाली होती. त्यानंतर आता मेळघाटच्या सेमाडोह परिसरात या पक्ष्याचे अस्तित्व आढळून आल्याने पक्षी अभ्यासक आणि वन्यजीवप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, सेमाडोह येथील पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्थानिक निसर्ग मार्गदर्शकांनी (गाईड्स) या दुर्मिळ पक्ष्याची नोंद केली आहे. यामध्ये भोला बाबू मावस्कर, अविनाश एच. मसराम, अशोक एस. मावस्कर आणि अक्षय भोला मावस्कर यांचा समावेश आहे.
मेळघाटसारख्या समृद्ध वनक्षेत्रात आजही अनेक दुर्मिळ पक्षी आणि वन्यजीवांचे अस्तित्व अधोरेखित करणारी ही नोंद आहे. स्थानिक निसर्ग मार्गदर्शकांचे जंगलाविषयीचे ज्ञान, पक्षीनिरीक्षणाची आवड आणि जैवविविधतेबाबतची जागरूकता यामुळे अशा महत्त्वपूर्ण नोंदी पुढे येत आहेत.
या नोंदीमुळे मेळघाटच्या पक्षीवैविध्यात आणखी एका महत्त्वपूर्ण प्रजातीची भर पडली असून मेळघाट हे पक्षी निरीक्षक, संशोधक आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी किती महत्त्वाचे क्षेत्र आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.